Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar 
नागपूर

मंत्र्याच्या गर्ल फ्रेन्डची आत्महत्या? आमदार भातखळकर म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : दोन दिवसांपूर्वी पुणे येथे पुजा चव्हाण नामक तरुणीने आत्महत्या केली होती. त्यानंतर ती तरुणी विदर्भातील एका मंत्र्याची गर्ल फ्रेन्ड असल्याची चर्चा राज्यभर पसरली होती. हे प्रकरण शांत झाले, असे वाटत असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री आपल्याच पक्षातील मंत्र्याच्या प्रकरणातील दादागिरी की ‘राठोडगिरी’ सहन करणार का, असा प्रश्‍न उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे. 

पुण्यातील पुजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यात विदर्भातील एका मंत्र्याचे नाव चर्चेत होते. त्यावरून आता भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांच्या प्रकरणातील दबंगगिरी सहन केली. त्यावर ते शांत बसले. आता ते आपल्याच पक्षातील मंत्र्याच्या प्रकरणातील दादागिरी की 'राठोडगिरी' सहन करणार का, असा सवाल करीत ‘राठोडगिरी’ हा शब्दाचा उल्लेख करून त्यांनी सेनेच्या एका मंत्र्यावर थेट निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्यांपासूनच महिलांना धोका आहे. कोणी बलात्काराची तक्रार करते, तर कोणी आपली मुलं मंत्र्यांनी पळविल्याची तक्रार करते. आता तर मंत्र्यांमुळे तरुणी आत्महत्या करायला लागल्या आहेत. यांच्या दबावामुळे नातेवाईक तक्रार करायला पुढे येत नाहीत. रक्षकच भक्षक बनले आहेत, असे सणसणीत आरोप भातखळकर यांनी केला. तसेच पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.   

नेमके काय आहे प्रकरण?
पुजा चव्हाण (वय २२) या तरुणीने गेल्या रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. रुग्णालयात नेत असताना तिने जीव सोडला. तिचे विदर्भातील एका मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते. त्यामध्ये वितुष्ट आल्याने तिने आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्या संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत कोणीही नाव उघड केलेले नव्हते. आता भातखळकरांनी थेट 'राठोडगिरी' म्हणत मंत्री सेनेचा असल्याचे म्हटले आहे. विदर्भात शिवसेनेचे एकच मंत्री आहेत आणि याच नावाचे आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण गंभीर वळण घेणार असे दिसते. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT