bhim army
bhim army 
नागपूर

रेशीमबाग मैदानावर सभा घेण्यासाठी भीम आर्मीला सशर्त परवानगी 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : रेशीमबाग मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून दाखल करण्यात आलेली भीम आर्मी संघटनेची याचिका सशर्त मंजूर करण्यात आली. उच्च न्यायालयाने टाकलेल्या अटींचा आयोजकांनी भंग केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल काल राखून ठेवला होता. 

कोतवाली पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मी संघटना व संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी ही याचिका दाखल केली होती. भीम आर्मीने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास आयोजकांवर कायदेशीर कारवाईसह न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवला जाईल, अशीही तंबी न्यायालयाने दिली. काल झालेल्या सुनावणी दरम्यान कोतवाली पोलीसांनी शपथपत्र दाखल करीत रेशीमबाग मैदानाशेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आहे.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भीम आर्मी संघटना या दोनही परस्पर विरोधी विचारसरणीच्या आहेत. अशा ठिकाणी सभा घेतल्यास निश्‍चितच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असेही शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले. न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेत निर्णय आजसाठी राखून ठेवला होता. या सभेमध्ये भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. फीरदोस मिर्झा यांनी, सरकारी पक्षातर्फे ऍड. केतकी जोशी यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समक्ष सुनावणी झाली. 

अशा आहेत अटी
रेशीमबाग मैदानावर उद्या (ता. 22) होणाऱ्या भीम आर्मी संघटनेची सभा 2 ते 5 या वेळेतच व्हायला हवी, 5 वाजता सभा संपल्यानंतर 6 वाजेपर्यंत मैदान रिकामे व्हायला हवे, या सभेचे रुपांतर आंदोलनामध्ये व्हायला नको, घेण्यात येणारी सभा राजकीय उद्देशासाठी व्हायला नको, वक्‍त्यांनी कुठलेही प्रक्षोभक भाषण करु नये, अशा अटी उच्च न्यायालयाकडून टाकण्यात आल्या आहेत. शिवाय, भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी "या आदेशांचे पालन करु' अशी हमी लिखीत स्वरूपामध्ये सभा सुरु करण्यापूर्वी न्यायालयाच्या रजिस्ट्रारला द्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT