Assembly Session 2023 : हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी विधान भवनात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक काहीही न बोलता थेट सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे चांगलेच जिव्हारी लागले. त्यांनी त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित मलिक यांना सरकारमध्ये घेऊ नये, अशी ठाम भूमिका मांडली. त्यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर मलिकांनी दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी बाकांवर बसणेच पसंत केले. त्यामुळे सत्ताधारी आमदारांसह विरोधकांच्या भुवया उंचावल्या.
भाजपच्या (BJP) पाठोपाठ शिवसेनेच्या (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटानेही नवाब मलिक यांना तीव्र विरोध सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर नवा पेच निर्माण झाला आहे. भाजपसोबत शिवसेनेचे आमदारही मलिक यांना विरोध करण्यासाठी फ्रंटफूटवर आले आहेत. त्यामुळे अजित पवार नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 8) नवाब मलिक यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील कार्यालयातच होती. सभागृहातून आल्यानंतर मलिक हे पूर्णवेळ कार्यालयातील सोफ्यावर बसून होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आल्यानंतर मलिक यांच्या आसपास सुरक्षारक्षकांचा गराडा होता. विधान भवनातील सर्व कॅमेऱ्यांच्या नजराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे वळल्या होत्या. कार्यालयातून मलिक हे आपल्या मोबाईल फोनवरून अनेकांशी बोलत होते. सुरुवातीला मलिक कार्यालयामध्ये एकटेच बसून होते. मात्र, थोड्या वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी मलिक यांनी चर्चा केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर तुरुंगातून बाहेर आले असले तरी भाजपने त्यांना असलेला विरोध कायम ठेवला आहे. कितीही गंभीर स्वरूपाचे आरोप असले तरी भाजपसोबत आल्यानंतर सर्वांच्या पापांचे क्षालन होते. भाजपसोबत जाणे म्हणजे गंगेमध्ये पाप धुतल्यासारखे आहे, अशी टीका सातत्याने होते. अशातच दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले मलिक सत्ताधारी बाकांवर आल्यानंतर, त्यांना भाजप क्लीन चिट देणार, की विरोध करणार याकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही लक्ष लागले होते.
सभागृहात पहिल्या दिवशी मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपकडून प्रतिक्रिया आली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना पत्र पाठवत भाजपची भूमिका स्पष्ट करून टाकली. कोणत्याही विषयावर उगाच आड पडदा नको म्हणून आणि भाजपची स्पष्ट भूमिका जगजाहीर व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र पाठवल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पत्र पाठवून मोकळे झाल्यानंतर भाजपचा गट सध्या 'वेट अँड वॉच' भूमिकेत आहे, तर शिवसेनाही मलिकांच्या विरोधासाठी सज्ज असल्याचे दिसते.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.