नागपूर

महात्मा फुलेंच्या पुतळ्याला विरोध करून भाजपचा खरा चेहरा उघड; नाना पटोलेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो

नागपूर : भंडारा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विरोध करून भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याचा आरोप अ. भा. किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
 
भंडारा येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमात भाजपच्या एका कार्यकर्त्याने व्यासपीठावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अरुण भेदे नावाचा हा कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता आहे. एका जागेवर महात्मा फुले यांचा पुतळा उभा करण्यासाठी त्याने प्रयत्न केला होता. परंतु स्थानिक नेत्यांनी त्याला दाद दिली नाही. 

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना `सरकारनामा'शी बोलताना कॉंग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले, की भाजपच्या नेत्यांनी अरूण भेदे या कार्यकर्त्याला महात्मा फुले यांचा पुतळा उभा करू देण्याचे आश्‍वासन दिले होते. ज्यावेळी या युवकाने तसा प्रयत्न केला. त्यावेळी हे नेते दिलेल्या आश्‍वासनावर कायम राहिले नाही. भंडाऱ्यात भाजप कार्यकर्त्याच्या आत्मदहनाच्या प्रयत्नासाठी भाजप नेत्यांची `जुमलेबाजी' कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 

ज्यावेळी या युवा कार्यकर्त्याची मदत हवी होती. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी अरुण भेदे या तरुणाचा फायदा करून घेतला. निवडणूक संपल्यानंतर या स्थानिक नेत्यांनी या तरुणाकडे व या तरुणाच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही. या निराशेतून या युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा आरोप पटोले यांनी केला. 

ओबीसींचे दैवत असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी जागा नाही. परंतु अतिक्रमण करून घर बांधण्यासाठी जागा आहे. हा महात्मा फुले यांचा अपमान असून यातून भाजपच्या नेत्यांची खरी नियत स्पष्ट झाल्याचा आरोप पटोले यांनी केला. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT