NCP likely to take stand as SS in past time in nagpur zp
NCP likely to take stand as SS in past time in nagpur zp 
नागपूर

नागपूर जिल्हा परीषद : फडणवीसांच्या काळात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेत यावेळी राष्ट्रवादी?

सरकारनामा ब्युरो

नागपूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादीने जिल्हा परिषदची निवडणूक आघाडी करून लढली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि विषय समिती सदस्यांच्या निवडणुकीतही आघाडी धर्म पाळला. जनतेने आम्हाला प्रश्‍न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्‍नांसाठी सत्ताधारीच काय, प्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती उज्ज्वला बोढारे यांचाही विरोध करू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे व सदस्य सलील देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेने बजावलेली भूमिका जिल्हा परिषदेत यावेळी राष्ट्रवादी बजावणार असल्याचे दिसतेय.

कोल्हे म्हणाले की, निवडणुकांपर्यंत आम्ही आघाडी धर्म पाळला. मात्र आता आम्ही जनतेची बाजू मांडणार आहोत. आम्ही सत्तेत आहोत जिल्हा परिषदेचा कारभार एककल्ली होऊ देणार नाही. चुका झाल्यास आम्ही विरोध करणार, जनतेची बाजू मांडणार. 

यावेळी सलिल देशमुख म्हणाले की, आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. आम्ही सगळे आपआपल्या सर्कल्समध्ये काही विशिष्ट कारणांवर निवडणुका लढलो. त्या कारणांशी आम्हाला प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज पडल्यास जनतेसाठी आम्ही सभागृहात विरोधी भूमिका घेऊ. 

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सदस्य दिनेश बंग, शेकापचे सदस्य समीर उमप यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

स्वीकृत सदस्य हवे
महानगर पालिकेमध्ये स्वीकृत सदस्य आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य हवे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठराव मांडणार असल्याचे सलिल देशमुख यांनी सांगितले. पक्षाकडूनही शासनाकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. काही दिवसात राष्ट्रवादीतर्फे जन आरोग्य यात्रा काढण्यात येणार आहे. सर्व सदस्यांतर्फे ग्रामीण भागातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या जातील. ग्रामीण भागातील नागरिकांच्या भेटी घेतल्या जातील. याद्वारे त्यांच्या समस्या समजून घेऊन भविष्यात पक्षातर्फे सिंचन शोधयात्राही काढली जाईल, अशी माहिती सलिल देशमुख यांनी दिली.

ग्रामीण भागात केरासिन वाटप
पूर्वी प्रमाणे ग्रामीण भागात केरोसिन वाटप करण्याची मागणी राष्ट्रवादीची आहे. हा विषय जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडणार असून शासनाकडेही मागणी करणार असल्याचे दिनेशचंद्र बंग यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT