Pooja Chavan - Raju Umberkar
Pooja Chavan - Raju Umberkar 
नागपूर

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : मनसेचे आक्रमक नेते गेले कुठे ?

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : बिड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीचा पुणे शहरातील वानवाडी येथे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. विरोधी पक्षाकडून पूजाच्या मृत्यूचा संबंध राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आला. पण या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही नेत्याने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर एरवी कुठल्याही प्रकरणात आक्रमक आंदोलने करताना दिसतात. पण यावेळी ते शांत का, असा प्रश्‍न आता विचारला जात आहे. 

राजू उंबरकर यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे राहतात आणि वनमंत्री संजय राठोड यवतमाळचे पालकमंत्री आहेत. राठोड यांनी राजीनामा द्यावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते सरकारवर दररोज दबाव वाढवत आहेत. आंदोलक पक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे, ती मनसे गप्प मात्र असल्यामुळे नागरिकांकडून प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जनतेवर अन्याय होत असताना उंबरकर पेटून उठतात. आंदोलक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अन्याय करणाऱ्या आणि मग्रूर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी प्रसंगी हाणामारीही केली आहे. त्यासाठी त्यांनी कारागृहाच्या वाऱ्यादेखील केल्या आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी ते न्याय मागतील आणि प्रसंगी रस्त्यावर उतरतील, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची अपेक्षा होती. तशी चर्चादेखील होत आहे. पण मनसेकडून अद्याप या प्रकरणी बोलायला कुणी पुढे आले नाही. त्यामुळे मनसे गप्प का, हा चर्चेचा विषय झाला आहे. 

मनसेने आंदोलनांतून विदर्भातील लोकांचे प्रश्‍न सोडवले आहेत. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे लक्ष विदर्भात उपराजधानीपेक्षाही वणीकडे अधिक राहिले आहे. नागपुरातही त्यांच्या जेवढ्या सभा झाल्या नाहीत, तेवढ्या वणीमध्ये झाल्या आहेत. विदर्भात उंबरकर हे राज ठाकरेंचे विश्‍वासू सैनिक म्हणून ओळखले जातात. आता त्यांच्याच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर राज्यभरातून आरोप होत असताना आणि विषय महिला अत्याचाराचा असताना मनसेचे विदर्भभर धडाडणारे नेते गप्प असल्यामुळे मनसेच्या विदर्भातील नेत्यांवर कुणाचा दबाव आहे, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT