Ramdas Athavale RPI
Ramdas Athavale RPI 
नागपूर

पक्ष सोडणाऱ्यांबद्दल पवारांना राग येणे स्वाभाविक : रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो

नागपूर : ''ज्या लोकांना सत्ता दिली, सारे काही दिले, ते पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना राग येणे स्वाभाविक आहे. परंतु, जे जात आहेत, त्यांना राष्ट्रवादी, कॉंग्रेसची सत्ता पुढील 25 वर्षे येणार नाही, याबाबत खात्री आहे. त्यामुळे ते पवारांना सोडून भाजप, शिवसेनेत जात आहेत,'' असे प्रतिपादन आज केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री  व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे केले. 

''ईव्हीएमवर निवडणुकीचा निर्णय कॉंग्रेसच्याच कार्यकाळात झालेला आहे. पराभवामुळे विरोधकांनी आता ईव्हीएमला विरोध करीत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. मतपत्रिकेवर निवडणुकीसाठी आमचीही तयारी आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा,'' असेही आठवले म्हणाले. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चा विदर्भ प्रदेश महामेळाव्यासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कार्यामुळे जनतेने त्यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागांवर यश मिळवून दिले. विरोधक मोदींच्या मागे लागले होते. त्यात अपयश आल्यानंतर आता ईव्हीएमच्या मागे लागले, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशात निवडणूक जिंकली, त्यावेळी ईव्हीएम सदोष नव्हत्या काय? असा सवालही त्यांनी कॉंग्रेसला केला. 

पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने प्रत्येकी 135 जागा घ्यावा, 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या. यातील 10 जागांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असून चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. युती झाल्यास किमान 240 जागा जिंकणार, असा दावा त्यांनी केला. यात भाजप सर्वाधिक जागा जिंकेल, असेही त्यांनी नमूद केले. भंडारा, उत्तर नागपूर, उमरखेड, वाशीम, दर्यापूर यांसह दहा जागा मागितल्या. सेनेनेही काही जागा आमच्यासाठी सोडाव्या, अशी मागणी करीत त्यांनी आरपीआय (ए) भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

लंडन महापालिकेवर डागली तोफ 
लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला नोटीस पाठविल्याबाबत लंडन म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर त्यांनी तोफ डागली. नोटीस पाठविणे हे लंडन महापालिकेने अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. या स्मारकाच्या आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली. यावर लंडन कोर्टात भारतीय उच्चायुक्त बाजू मांडणार, असे आठवले यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT