पुसद (जि. यवतमाळ) : शिवसेनेचे नेते माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पोहरादेवी गडाच्या महंतासह महाराष्ट्रातील बंजारा समाजाची झालेली नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळात बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गहुली-पुसदच्या नाईक घराण्याने महाराष्ट्राला हरितक्रांती, जलक्रांती, गुटखा बंदी यांसारखे कार्यक्रम राबवून जनतेची सेवा केली. त्याच घराण्याचे वारसदार असलेले नव्या उमेदीचे आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, या मागणीची बातमी आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्रीपद राष्ट्रवादीच्या नवख्या आमदाराला मिळणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा-दिग्रस मतदार संघातील शिवसेनेची संजय राठोड यांची बुलंद तोफ पूजा चव्हाण प्रकरणातील राजीनाम्यामुळे थंडावली आहे. त्यांच्या बंजारा समर्थकांच्या शक्ती प्रदर्शनाने पोहरा देवी संस्थानचे महंत व बंजारा समाज राठोड यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केला. त्यातच पूजा चव्हाण यांच्या आई-वडिलांनी राजकारणाचा बळी म्हणून संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली. विरोधी पक्षाने संजय राठोड यांना टार्गेट केले व बंजारा समाजाची बदनामी केली. याबद्दलचा रोष या समाजात व्यक्त होत आहे. त्यामुळे या समाजाची नाराजी दूर करण्यासाठी बंजारा समाजातील उमदे नेतृत्व इंद्रनील नाईक यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
हरितक्रांतीचा मंत्र देऊन महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याची किमया अकरा वर्षाच्या प्रदीर्घ काळात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली. महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी करताना शेती आणि शेतकऱ्यांना बळ दिले. पंचायत राज, उद्योग धंदे, जल व विद्युत प्रकल्प प्रत्यक्ष अमलात आणले. त्यांचे पुतणे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण तसेच तंत्र शिक्षणात मोठी कामगिरी बजावली. राजकीय गुन्हेगारीवर प्रहार केले. माजी अन्न औषधी व प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी गुटखाबंदीचा निर्णय घेऊन व्यसनमुक्तीला चालना दिली. अर्थातच नाईक घराण्याचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे. यात नाईक घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे शिलेदार, वसंतराव नाईक यांचे नातू इंद्रनील आता पुसद विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी त्यांचे काका भाजपचे निलय नाईक यांचा दहा हजारांवर मतांनी पराभव केला. सध्यातरी पुसद विधानसभा मतदारसंघ नाईक घराण्याचा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. इंद्रनील नाईक यांच्या रूपाने हा गड अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार अनुकूल आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या फेररचनेत इंद्रनील यांना संधी आहे, अस बोलले जात आहे.
बंजारा समाज वसंतराव नाईक यांना दैवत मानतो. त्यामुळेच नाईक परिवारातील इंद्रनील नाईक यांच्यानंतर बंजारा समाजाच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत इंद्रनील नाईक यांचा समावेश होऊ शकतो, असा राजकीय होरा आहे. येत्या काळात मंत्रिमंडळाची पुनर्रचना अपेक्षित आहे. काँग्रेस पक्षाचे नाना पटोले, सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एकनाथ खडसे, इंद्रनील नाईक यांची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच रिक्त वनमंत्री पदाबाबत शिवसेनेची हीच भूमिका अपेक्षित आहे. राज्यातील बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देताना नाईक घराण्याचा पर्यायाने इंद्रनील नाईक यांचा समावेश होऊ शकतो. तसे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार यात्रेदरम्यान पुसद येथे दिलेला आहे. सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली जाईल, असे राजकीय धुरीणांना वाटते.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.