devendra fadnavis | narendra modi | ajit pawar  sarkarnama
नाशिक

Ajit Pawar : भाजपने अजित पवारांची झोप उडवली?

Chhagan Bhujbal : सध्या राज्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भुजबळ येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे नेतृत्व करतील असे दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये ही अस्वस्थता आहे.

Sampat Devgire

Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडक्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश नाही. एरव्ही सत्तेत असताना ते क्वचितच नाशिकचे दौरे करीत. सध्या मात्र वेगळ्याच कारणाने त्यांचे दौरे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) हे आता प्रचाराला बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे दौरे आहेत. यामध्ये ते आठवड्याभरात दुसऱ्यांदा नाशिकला येत आहेत.

गेल्या आठवड्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी नाशिकचा दौरा केला. विधानसभा निवडणुकीचा आढावा तटकरेंनी घेतला. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री पवार यांनी कळवण मतदार संघाचा दौरा केला. येत्या गुरुवारी उपमुख्यमंत्री पवार आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघाचा दौरा करतील.

उपमुख्यमंत्री पवार नाशिककडे त्यांचे फारसे लक्ष नव्हते. ते क्वचितच या भागाचा दौरा करीत. राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री छगन भुजबळ यांच्यावर या जिल्ह्याची जबाबदारी सोपविली होती.

सध्या मात्र राज्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भुजबळ येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे नेतृत्व करतील असे दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये ही अस्वस्थता आहे. या पक्षातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर निघून गेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना नाशिकमध्ये लक्ष घालावे लागले आहे. अजित पवार यांनी लक्ष घातल्याने नाशिकचे चित्र कोणत्या दिशेला झुकेल हे अद्यापही स्पष्ट नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले.

महायुती अर्थात विशेषता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातच मोठा धक्का बसला. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाशी युती करू नये, असा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरल्याचे बोलले जाते.

लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. अशा स्थितीत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढविण्यासाठी राज्याच्या विविध भागात दौरे करण्यास बाहेर पडावे लागले आहे. सिन्नर मतदार संघाचा त्यांचा दौरा त्यामुळेच चर्चेचा विषय आहे. हा दौरा झाल्यानंतर लगेचच ते पुढील पाच दिवस आपल्या आवडत्या पुणे जिल्ह्याचा दौरा करतील.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या या दौऱ्यात सिन्नरसह ते देवळाली आणि नाशिक शहरातील राजकीय आढावाही घेतील. एक दिवसाच्या या मुक्कामी दौऱ्यात विधानसभा निवडणुकीचा आढावा आणि आपल्या विद्यमान आमदारांची जागा राखण्याचे नियोजन ते करतील, असे सूत्रांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या उपमुख्यमंत्री पवार गटात गेलेले सहा आमदार आहेत. या सहाही आमदारांना आपला मतदारसंघ राखण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची मोठ्या संघर्ष करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांच्या संभाव्य असहकारामुळे पवार यांचे दौरे वाढल्याचे लपून राहिलेले नाही.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT