Bjp Leader Ekanath Khadase Reacts on his Mention in Maharashtra Assembly
Bjp Leader Ekanath Khadase Reacts on his Mention in Maharashtra Assembly 
नाशिक

थोरात, जयंत पाटलांनी केलेला उल्लेख हीच माझ्या कामाची पावती : एकनाथ खडसे (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो

जळगाव : ''भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून आपण सत्तेत कमी आणि विरोधी पक्षात जास्त काम केलेले आहे. विरोधी पक्षनेते आक्रमक आणि पूर्ण माहितीनिशी बोलले तर त्याला एक वजन असते. आपण विरोधी पक्ष नेता म्हणून आपल्या कामाची छाप पाडली. त्यामुळेच आज बाळासाहेब थोरात व जयंत पाटील यांनी आपल्या कामाचा उल्लेख केला. हीच आपल्या चांगल्या कामाची पावती आहे,'' अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यानीं जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

राज्याच्या विधीमंडळात आज विरोधी पक्ष नेतेपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनाचे भाषण करतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या  खडसे यांच्या कामाचा उल्लेख केला. याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, ''त्यांनी आपल्या कामाचा उल्लेख केला ती आपल्या कामाची पावती आहे. आपण जे काम केले त्याच पध्दतीचे काम विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना अपेक्षीत असावे. विरोधी पक्ष नेत्याचे यापेक्षाही चांगले काम देवेंद्र फडणवीस करतील अशी अपेक्षा आहे.''

ते पुढे म्हणाले, "विरोधी पक्ष नेता हा उद्याचा सत्ता बदल करणारा नेता म्हणून त्याकडे बघितले जाते. किंबहुना आजचा विरोधी पक्ष नेता उद्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याकडे बघितले जाते. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल मान विरोधी पक्ष नेत्याला असतो. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या फार अपेक्षा असतात. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न लावून धरणे, तसेच कोणत्याही प्रश्‍नावर तडजोड न करता सरकारला जेरीस आणून त्या प्रश्‍नाचा 'पॉझीटिव्ह'निकाल आणणे हा खरा कौशल्याचा भाग असतो.''

''मला एक चांगला विरोधीपक्ष नेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. थोरात व पाटील यांनी आज मी विधीमंडळात नसल्याची खंत व्यक्त केली. ती खंत मलाही आहे. विधानसभेत अनुभवी व्यक्तीची आवश्‍यकता असते. ही कमतरता थोरात व पाटील यांनी बोलून दाखविली. मला अभिमान आहे, की लोकशाहीत जनतेने जी जबाबदारी दिली ती आपण व्यवस्थितपणे पार पाडली.''असेही खडसे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT