BJP  Leader Girish Mahajan Worried About Nahik Mayor Election
BJP Leader Girish Mahajan Worried About Nahik Mayor Election 
नाशिक

भाजप नगरसेवकांचे नातेवाईक शिवसेना नेत्यांना भेटल्याने गिरीश महाजन सावध

सरकारनामा ब्युरो

नाशिक : सरकारपासून तर आमदार, नगरसेवकांच्या जोडतोडीने राजकीय गणिते जुळविण्यात माजी मंत्री गिरीश महाजन कुशल मानले जातात. मात्र, नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेची धुरा त्यांचे शिष्य आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे आली आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत असुनही स्वतः गिरीश महाजन यांचीच धावाधाव सुरु असल्याचे चित्र आहे.

नाशिक महापालिकेत 122 नगरसेवक आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 65 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. या नगरसेवकांना उमेदवारी देण्यापासून तर त्यांच्या निवडणुकीत सर्व रसद पुरवण्यात काम माजी शहराध्यक्ष, माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा सिंहाचा वाटा होता. श्री. सानप यांचे गिरीश महाजनांशी बिनसल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली. त्यानंतर सध्या ते शिवसेनेत आहेत. राज्यात शिवसेना- भाजपची राजकीय मैत्री बिनसली. त्याचे पडसाद यंदाच्या महापौर निवडणुकीत दिसण्याची चिन्हे आहेत. 

काल भाजपच्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने वेगळ्या राजकीय समीकरणांची चाहुल लागली आहे. त्यामुळे माजी मंत्री गिरीश महाजन यांनाच मैदानात येऊन धावपळ करावी लागत आहे. त्यांची गाठ त्यांच्याच राजकीय शिष्याशी आहे. त्यामुळे महापालिकेत काय घडते याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

महापालिकेत भाजपला बहुमत असले तरी बदलत्या राजकीय स्थितीमुळे वातावरण पूर्णतः बदलल्याची भीती भाजपला वाटत आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर सारत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडी झाली आहे. तोच पॅटर्न नाशिक महापालिकेत राबविला जाऊ शकतो. त्यात मनसेची भर पडणार आहे. विरोधकांचे बहुमत संकलित केल्यास 52 पर्यंत नगरसेवकांचा आकडा पोचतो.

नगरसेवक फुटण्याटी भिती असतांनाच शुक्रवारी भाजपच्या पाच नगरसेवकांच्या नातेवाइकांनी माजी आमदार सानप यांच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली. सानपसमर्थक नगरसेवकांची संख्या दहा ते बारा असल्याचे बोलले जात आहे. सानपसमर्थक आमदार तटस्थ राहिल्यास बहुमताची संख्या घटून विरोधकांची सत्ता सहज स्थापन होणे शक्‍य आहे. तर सभागृहात हजर राहून विरोधात मतदान केले तरी विरोधकांची सत्ता येणे शक्‍य आहे. हे टाळण्यासाठी स्वतः गिरीश महाजन मैदानात उतरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT