सुनील गायकवाड
सुनील गायकवाड 
नाशिक

मालेगावमध्ये असे काय घडले?; भाजप करणार कॉंग्रेस- शिवसेना आघाडीला मतदान !

सरकारनामा ब्युरो

मालेगाव ः राज्यात शिवसेना- भाजप युतीचा काडीमोड झाला आहे. सध्या तर या दोन्ही जुन्या मित्रांतून विस्तवही जात नाही. याउलट शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेसला बरोबर घेत राज्याच्या राजकारणात भाजपला एकटे पाडले आहे. या वेगळ्या वळणावर मालेगावच्या महापौर निवडणुकीत मात्र शिवसेना, कॉंग्रेस आघाडीला भाजप मतदान करणार आहे. असा पक्षादेशच गटनेते सुनिल गायकवाड यांनी काढला आहे. त्यामुळे असे काय घडले की, भाजप शिवसेना, कॉग्रेसच्या विजयासाठी झटतो आहे याची चर्चा जोरात आहे.

यासंदर्भात स्थानिक परिस्थिती पाहता व विरोधी गट "एमआयएम'चा असल्याने मालेगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अनुक्रमे कॉंग्रेस व शिवसेना आघाडीला मतदान करण्याचा पक्षादेश (व्हीप) भाजप नगरसेवकांना बजावण्यात आल्याचे मनपा भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी सांगितले. या निर्णयाने कॉंग्रेस- शिवसेना आघाडीला बळ मिळाले असून, बहुमताचा आकडा 50 पेक्षा अधिक होणार आहे.

श्री. गायकवाड म्हणाले, की आगामी महापौर निवडणुकीसंदर्भात भाजपचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर आदींसह भाजप नेत्यांशी चर्चा केली. त्यांना स्थानिक परिस्थिती समजावून सांगितली. मुंबई येथे आमदार दादा भुसे यांच्याशीही चर्चा केली. महापौर रशीद शेख व श्री. भुसे यांनी विकासकामांसाठी मोठ्या मनाने सत्तारुढ गटात सहभागी करून घेण्यास संमती दर्शविली. विकासकामांमध्ये मतभेद नको, यासाठी आपण हा निर्णय घेतला. आपल्या नावाची उपमहापौरपदासाठी चर्चा होती. मात्र, राज्यातील बदलत्या घडामोडी पाहता आपण यासंदर्भात फारसा आग्रह धरला नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार शिवसेनेचे काम केले. आता शहर व तालुक्‍याच्या हिताचा निर्णय घेतला. पक्षाने सत्तारुढ गटाबरोबरच राहण्यासंदर्भात सूचना केल्यानंतर नगरसेवकांना आदेश बजावला आहे. सभागृहातील सर्व नेत्यांना आदेश बजावण्यात येईल. पक्षादेशाचे पालन न झाल्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करू.

भाजपचे महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. गुरुवारी (ता. 12) महापौर- उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. श्री. गायकवाड यांनी महापौरपदासाठी कॉंग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे नीलेश आहेर यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला आहे. 

भाजपमधील स्थानिक गटबाजी पाहता नऊपैकी दोन नगरसेवक नाराज असल्याचे समजते. या आदेशामुळे त्यांची कोंडी होणार आहे. हे नगरसेवक काय निर्णय घेणार, पक्षादेशाचे उल्लंघन करणार की श्री. गायकवाड यांच्या पाठीशी राहणार, याविषयी उत्सुकता आहे. सद्यःस्थिती पाहता कॉंग्रेस व शिवसेना आघाडीची महापौर, उपमहापौर निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT