citizens of minister gulabrao patil constituency complain about water shortage  
नाशिक

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावातच पाणी टंचाई...हंडा मोर्चा काढण्याची वेळ

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच पाणी टंचाई असल्याचे समोर आले आहे. पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांना अखेर हंडा मोर्चा काढून निषेध नोंदवावा लागला.

कैलास शिंदे

जळगाव : पाणीपुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदारसंघातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांत एकदा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी आज शिवसेनेची सत्ता असलेल्या धरणगाव नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला. 

राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या धरणगाव विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या धरणगाव शहरात तर ऐन हिवाळ्यात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतापलेल्या धरणगावकरांनी आज दुपारी नगरपालिकेवर धडक 'जन आक्रोश हंडा मोर्चा' काढत निष्क्रिय नगरपालिका प्रशासन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पालिकेच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या  कार्यपद्धतीचा निषेध केला.

तांत्रिक पाणी टंचाई

गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. असे असताना धरणगाव शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केवळ योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कृत्रिम पाणी टंचाईला धरणगावकर कंटाळले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा यंत्रणेला शिस्त लागत नसल्याने सोमवारी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिला तसेच आबालवृद्ध डोक्यावर पाण्याचे खाली हंडे घेऊन नगरपालिकेवर धडकले. मोर्चा नगरपालिकेवर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे, अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

प्रवेशव्दारावर फोडले माठ

मोर्चेकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. दैनंदिन कामात महिलांना पाणीटंचाईमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे आहे. दररोज दिवस उगवल्यानंतर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. नगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देखील पुरवू शकत नसेल तर काय उपयोग, सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात, असा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी या वेळी व्यक्त केल्या. काही महिलांनी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाण्याची मातीची भांडी फोडून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला.

Edited by Sanjay Jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT