Kashinath Mengal - Nirmala Gavit
Kashinath Mengal - Nirmala Gavit 
नाशिक

आमदार निर्मला गावितांच्या पक्षांतराने उमेदवारीसाठी शिवसेनेत धावपळ, कॉंग्रेसमध्ये पळापळ

सरकारनामा ब्युरो

इगतपुरी : कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी ऐनवेळी पक्षांतर करीत शिवबंधन बांधले. त्यामुळे गेले वर्षभर तयारी करीत असलेल्या शिवसेनेतील इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. उमेदवारीसाठी त्यांची सध्या मुंबईच्या नेत्यांकडे धावपळ सुरु आहे. तर कॉंग्रेसच्या नेत्यांची उमेदवाराच्या शोधासाठी पळापळ सुरु झाली आहे. त्यामुळे इगतपुरी मतदारसंघाची निवडणुक सध्या इच्छुकांऐवजी पक्षनेत्यांतच रंगतदार झाली आहे.

सलग दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेल्या कॉंग्रेसच्या आमदार गावित यांनी नाही, नाही म्हणत ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने मतदारसंघातील राजकीय नूर पालटला आहे. ऐनवेळी हक्काचा उमेदवारी गमावला मात्र, कॉंग्रेसचे प्रमुख नेते पक्षातच थांबले. त्यामुळे त्यांनी अधिक जोमाने तयारी करीत शक्तीप्रदर्शन केले.

संभाव्य उमेदवार म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या नावाचीही चर्चा झडली. आदिवासी संघटनेचे लकी जाधव यांनीही उमेदवारीचा दावा केला आहे. कॉंग्रेस नेत्यांना भेटून त्यांनी व्युहरचाने केल्याचा दावा केला. मात्र, कॉंग्रेसने आमदार गावित यांचा पक्षत्याग गांभीर्याने घेतला आहे. त्यासाठी प्रभावी यंत्रणा व प्रबळ उमेदवार देण्याच्या हालचाली आहेत.

श्रीमती गावित यांच्या पक्षांतराने गेले वर्षभर त्यांचे विरोधकांचे शिवसेनेत धृविकरण झाले होते. काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, शिवराम झोले हे तिन्ही माजी आमदार एकत्र येत त्यांनी नेते, कार्यकर्त्यांची जमवा जमव केली होती. विनायक माळेकर, भाऊराव डगळे, जिल्हा परिषद सदस्य सुशिला मेंगाळ या इच्छुकांनी चांगली वातावरण निर्मिती केली होती. त्यात बहुतांश नेत्यांनी मेंगाळ यांच्या उमेदवारीला अनुकुलता दाखवली होती. आमदार गावित यांच्या प्रवेशाने त्यांच्या उमेदनारीच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. या सर्व नेत्यांची सध्या उमेदवारीसाठी शिवसेनेच्या मुंबईच्या नेत्यांकडे धावपळ सुरु आहे. कितीही धावपळ केली तरी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमाधून गावित यांनी उमेदवारीच्या आश्‍वासनानंतरच पक्ष प्रवेश केल्याचे बोलले जाते. अशा स्थितीत शिवसेनेकडून आमदार गावित यांच्या उमेदवारीची फक्त घोषणाच शिल्लक आहे.

या स्थितीत शिवसेनेतील गावित विरोधक पक्षाकडून घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत. गावित यांनाच उमेदवारी मिळाल्यास सर्व विरोधक मिळून एकच उमेदवार देण्याच्या हालचाली आहेत. यामध्ये गावित या नंदुरबारच्या आहेत. स्थानिक आदिवासींशी त्यांचा थेट संबंध नाही. त्यामुळे स्थानिक आदिवासी विरुध्द बाहेरचा आदिवासी असा राजकीय रंग या निवडणुकीला मिळेल. सध्या तरी यंत्रणेत गावित यांची आघाडी असली तरी सर्व विरोधक एकत्र आल्यास ही निवडणूक उमेदवारांऐवजी स्थानिक राजकीय व आदिवासी नेत्यांतच रंगण्याची चिन्हे आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT