Deepak Nikajle Demands revoking Permission of RPI Athavale Faction 
नाशिक

आरपीआय'चा अध्यक्ष मी आहे, रामदास आठवले नाहीत : दीपक निकाळजेंचा दावा

निवडणुक आयोगावर दबाव आणून रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची नोंदणी केली. या गटाची नोंदणी रद्द करावी, यासाठी आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

सरकारनामा ब्युरो

नाशिक :  गेल्या काही महिन्यांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) याबाबत संभ्रम आहे. 2018 मध्ये मूळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. त्यानंतर मी अध्यक्ष झालो. एकाच नावाचे दोन पक्ष अस्तित्वात राहू शकत नाही. मात्र निवडणुक आयोगावर दबाव आणून रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची नोंदणी केली. या गटाची नोंदणी रद्द करावी, यासाठी आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निकाळजे हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा लहान भाऊ तसेच श्री. आठवले यांचे एकेकाळचे सर्वात विश्‍वासू सहकारी आहेत. हॉटेल एसएसके सॉलिटियर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राज्याध्यक्ष अमित मेश्राम, राष्ट्रीय संघटक सुनील खांबे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महावीर सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख अशोक गायकवाड, दिनेश अहिरे आदी उपस्थित होते.

श्री. निकाळजे यांनी सांगितले, की गेल्या काही महिन्यांपासून आरपीआयच्या गटांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्ष कंसात 'ए' लिहितात. त्यावरून संभ्रम आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) 2009 ते 2018 या काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले होते. 2018 मध्ये रामदास आठवले यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाचे महासचिव मोहनलाल पाटील यांनी भोपाळला बैठक बोलावली. त्यानंतर माझी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाला मान्यता मिळवली. एकाच नावाच्या दोन पक्षांना मान्यता देता येत नाही. त्यामुळे आगामी काळात निवडणुक आयोगाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही श्री. निकाळजे यांनी सांगितले.

''गेली 20 ते 25 वर्षे रामदास आठवले यांच्या सोबत काम करत होतो. पण पक्षाला त्यांनी व्यापक स्वरूप न देता एका जातीपुरते मर्यादित ठेवले. त्यामुळे पक्षाची पिछेहाट झाली. नगरसेवक, आमदार, खासदार झाले तर पक्षाची ताकद वाढते. पण असा प्रयत्न केला गेला नाही. आगामी काळात आम्ही पक्षबांधणीसाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून तेथे पदाधिकारी नेमणार आहे. नवीन पिढीला प्राधान्य दिले जाणार आहे,'' असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत असले तरीही आम्ही कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. तसेच आरपीआयचे वेगवेगळे गट असले तरी ते आमच्या पक्षात विलीन होतील, अशी आशा असल्याचेही निकाळजे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT