MLA Rajabhau Waje Shivsena Candidate from Sinner
MLA Rajabhau Waje Shivsena Candidate from Sinner 
नाशिक

शिवसेनेची साथ आणि पाच वर्षांतील कामांमुळे विजयाबाबत निर्धास्त : आमदार राजाभाऊ वाजे

सरकारनामा ब्युरो

सिन्नर : ''पंधरा वर्षे माजलेली दहशत गेल्या पाच वर्षांत आपण संपवली. पाच वर्षे मी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम केले. पाच वर्षांच्या कार्यकाळात काम आणि फक्त कामच केले. एकही काम चुकीचे केले नाही, हे छातीठोकपणे मी सांगू शकतो," असे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी येथे केले.

शिवसेना-भाजप महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तहसील कार्यालय रोडवर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ''पाच वर्षांत तालुक्‍यात बरीच कामे झाली. अनेक कामे बाकी आहेत. तालुक्‍यात अनेक गावांतील मतदार सुज्ञ आहेत. त्यांच्या गावात किती कामे झाली, हे त्यांना माहिती आहे. माझ्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिकेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच हे शक्‍य झाले. शहरातही भरपूर कामे झाली. अनेक वर्षांपासून जाचक असणारी घरपट्टी कमी करण्यात यश आले. केवळ अडीच वर्षांत पालिकेची सत्ता आमच्या ताब्यात आली. त्या वेळी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या कामात अनेक कमतरता करून ठेवल्याने योजना अडचणीत आली होती. त्यात पुन्हा नवीन तरतुदी करून योजनेसाठी लागणारा वीजपुरवठा प्रकल्प नव्याने मंजूर करून घेतला. यामुळे काही महिन्यांतच पाणीयोजना कार्यान्वित होईल.''

विरोधकांनी 15 वर्षांत अनेक भूलथापा दिल्या. आताही देतील. त्याला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. लोकांचे ऐकून वेळ मारून नेणे मला जमत नसल्याचे सांगितले. विरोधकांवर सडकून टीका करताना आमदार वाजे यांनी आतापर्यंत माझा चांगुलपणा पाहिला, पण वेळप्रसंगी ठोशास ठोसाही देऊ. निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही दिला. तालुक्‍यात आता आपला भाग तो त्यांचा भाग, असे आता राहिलेले नाही. आता सगळीकडे शिवसेना दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, रासपचे जिल्हाध्यक्ष अरुण आव्हाड, भाजप तालुकाध्यक्ष सुनील केकाण आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT