दिंडोरी : "मनमाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात धनराज महाले यांच्या पक्षप्रवेशाप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी नावे व्यासपीठावरून घेतली, त्यांचा व आमचा काडीमात्र संबंध नाही. आम्ही कोणीही तेथे हजर नव्हतो. धनराज महाले एकटेच राष्ट्रवादीत गेले. त्यांचे सर्व सैन्य मनापासुन शिवसेनेतच आहे," असा दावा शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश देशमुख यांनी केला आहे.
शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी दोन दिवसांपूर्वी मनमाड येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले. त्या सर्व पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी दिंडोरी येथे बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी "राजकारण आणि निवडणुका नेत्यांच्या बळावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर होतात. धनराज महाले एकटेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेत. प्रवेश झाला त्या सभेत शिवसेनेच्या नेत्यांची यादी वाचून दाखविण्यात आली. ती चुकीची होती. कारण आम्ही तिथे नव्हतो. आम्ही कालपण शिवसेनेत होतो आणि आजही शिवसेनेतच आहोत. आमचा राष्ट्रवादी काँग्रेसशी व धनराज महाले यांच्याशी काहीही संबंध नाही," असा खुलासा शिवसैनिकांनी पंचायत समिती सभागृहात पत्रकारांशी बोलताना केला.
या वेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. माजी गटनेते प्रवीण नाना जाधव, सदाशिव गावित, माजी सभापती एकनाथ गायकवाड, उत्तम जाधव, पंढरीनाथ भरसाठ, सुरेश देशमुख, संतोष कहाणे, तानाजी गावित, साहेबराव शिंदे, भरत (राजू) गोतरणे, नंदू बोंबले, नदीम सय्यद, माणिक उफाडे आदी उपस्थित होते. मतदारसंघातील जनतेची दिशाभूल होऊ नये, यासाठी खुलासा करत असल्याचे शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.