नाशिक

भाजप नगरसेवक दिनकर आढावांविरोधात जमीन बळकावल्या प्रकरणी गुन्हा 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिनकर आढाव, माजी नगरसेवक पवन पवार यांनी महिलेची फसवणुक करुन जमीन बळकावली, तसेच या जमिनीची परस्पर विक्री केली आणि विरोध करणाऱ्या जमीन मालक महिलेस शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला आहे. यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने हे हाय प्रोफाईल राजकीय नेत्यांचे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. 

सीमा भगवान गांगुर्डे या महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार या महिलेची दसक शिवारात 21 गुंठे जमीन आहे. संशयितांनी बनावट कागदपत्रे बनवून सात- आठ वर्षांपासून जमीन बळकावली. भाजप नगरसेवक आढाव यांसह भारिप- बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंठेवारीने जमीनीची विक्री केली. प्रत्यक्षात मिळकत पवार यांच्या नावावर नसतानाही त्यांनी जागेची परस्पर विक्री केली. विलासराज गायकवाड यांना विचारल्यावर त्यांनी बावन्न लाख रुपयांना जमीन खरेदी केल्याचे सांगीतले. 

जागामालकाच्या लक्षात आले असता, जाब विचारल्यावर शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नगरसेवक आढाव, सामाजिक कार्यकर्ता विलासराज गायकवाड, दीपक सदाकळे, पवन पवार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT