नाशिक : जगभर संसर्ग झालेल्या कोरोना विषाणुंचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने नोटीसा दिल्याने तसेच जिल्हा प्रशासनाने आवाहन केल्याने पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरासह कपालेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनार्थ आज दुपारपासून बंद करण्यात आले आहे. आता ही मंदिरे पुढील सुचना येईपर्यंत बंद राहणार असलीतरी मंदिरातील नित्य पूजाविधी सुरूच राहणार आहेत. तीनशे वर्षात पहिल्यांदाच काळाराम मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
प्रभू रामचंद्राने सीतामाई व लक्ष्मणासह तब्बल चौदा वर्षे पंचवटीतील दंडकारण्यात वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. या तिघांचा प्रदीर्घ काळ ज्याठिकाणी वास्तव्य राहिले, त्याचठिकाणी या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे श्री काळाराम मंदिरात देशाच्या सर्वच भागातून भाविकांची बारमाही वर्दळ असते.
पुढील महिन्याच्या सुरवातीलाच (ता.2) श्रीरामाच्या जन्मोत्सव होत आहे. त्यामुळे मंदिरातील वर्दळ वाढली आहे. परंतु देशभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आदेश दिल्याने तसेच काही काळासाठी मंदिर बंद ठेवण्याचे आदेशित केल्याने आज दुपारी विश्वस्तांनी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील आज दुपारपासून श्रीराममंदिर दर्शनार्थ बंद ठेवण्यात आले आहे.
श्री काळाराम मंदिर प्रथमच बंद
पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी या मंदिराची उभारणी अठराव्या शतकात केली आहे. मंदिराच्या उभारणीपासून आजवर इतक्या प्रदीर्घ काळ मंदिर कधीही दर्शनार्थ बंद राहिलेले नाही, असे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले. मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होते, त्यामुळे आता प्रशासनाच्या सुचनेनुसार व पुढील सुचना येईपर्यंत देवस्थान बंदच राहील, असे त्यांनी सांगितले. मात्र याकाळात आतील दैनंदिन पूजाविधी व इतर दिनक्रम सुरळीत सुरू राहतील.
कपालेश्वर मंदिरही बंद
पंचवटीतील श्री काळारामानंतर सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर म्हणजे कपालेश्वर महादेव मंदिर. कोरोनाचा डंख इतर धार्मिक स्थळांप्रमाणेच कपालेश्वरालाही बसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी नोटीस बजावल्याने आज दुपारपासून हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनी प्रशासनाच्या सुचनेचा आदर करत हा निर्णय घेतलेला असलातरी बंदच्या काळातही मंदिरातील नित्य पूजाअर्चा व इतर दिनक्रम सुरूच राहणार आहेत. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अनिल दौंडे, भाऊसाहेब गंभीरे, मंडालेश्वर काळे आदींनी केले आहे.
रामकुंडावर शुकशुकाट
दरम्यान कोरोनाचा धसका घेत धार्मिक पर्यटकांनीही नाशिककडे पाठ फिरविल्याने एरवी मोठी वर्दळ असलेल्या रामकुंडावरील गर्दीही ओसरली आहे. एकतर कुंडातील पाणी अत्यंत दुषित झालेले आहे, दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वर्दळ रोडावली आहे. त्यामुळे पहाटेपासून वर्दळ असलेल्या रामकुंडावर सद्या दशक्रिया विधींचा अपवाद वगळता शुकशुकाट दिसून येतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.