Seema HIrey MLA BJP Nashik
Seema HIrey MLA BJP Nashik 
नाशिक

आमदार सीमा हिरेंच्या मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांनी सुरु केला प्रचार 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यासमोर पक्षातील तब्बल सोळा जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. यातील तिघांनी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहताच प्रचाराला सुरवात केली आहे. तर एकाने पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाशिक पश्‍चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत नक्की कोणाचा प्रचार करावा, असा संभ्रम आहे.

या मतदारसंघात भाजपच्या मुलाखतींत विद्यमान आमदार सीमा महेश हिरे यांसह महापालिका गटनेते सतीश सोनवणे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांसह शशिकांत जाधव, अलका अहिरे, मुकेश शहाणे या पाच नगरसेवकांचा समावेष आहे. याशिवाय कैलास अहिरे, उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार, जगन आण्णा पाटील, दिलीपकुमार भामरे, अनिल जाधव, बाळासाहेब पाटील, प्रशांत कोतकर, विक्रम नागरे, निर्मला पवार, मयुर अलई यांनीही मुलाखती दिल्या. तब्बल सोळा इच्छुक असल्याने मुलाखतीच्या कार्यक्रमातही नेत्यांना संभ्रम झाला होता. त्यांनी सर्वांना एकत्र बसवूनच चर्चा केली.

औद्योगिक वसाहतींनी वेढलेल्या अन्‌ सिडको या कामगारांची वसाहत असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात महापालिकेचे अकरा प्रभाग व चौव्वेचाळीस नगरसेवक आहेत. त्यातील बेचाळीस नगरसेवक भाजप, शिवसेनेचे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदार संघात युतीचे हेमंत गोडसे यांना 1,44,144, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ यांना 40,321, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना 20,784 तर अपक्ष माणिकराव कोकाटे यांना 6,719 मते मिळाली होती. त्यामुळे युतीच्या इच्छुकांचे मनोबल वाढलेले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जागावाटपात सध्या शहरातील चार पैकी तीन मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे पश्‍चिम मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगीतला आहे. अशा स्थितीत मतदारसंघ कोणाकडे हे अनिश्‍चित आहे.
त्यात भाजपच्या इच्छुकांची भलीमोठी यादी विद्यमान आमदार हिरे यांना अस्वस्थ करु शकते.

गंमत म्हणजे यातील मयुर अलई, उद्योग आघाडीचे प्रदिप पेशकार आणि स्वेच्छा निवृत्ती घेतलेले अधिक्षक अभियंता दिलीपकुमार भामरे यांनी प्रचार सुरु केला आहे. श्री. पेशकार यांच्या मते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. या गोंधळामुळे सध्या भाजपचे कार्यकर्तेच संतापलेले आहेत. काहींनी पेशकार यांचे फलकही फाडले. त्यामुळे निवडणुकीआधीच पश्‍चिम मतदारसंघात भाजपमध्ये चढाओढ रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT