Ajit Pawar  Sarkarnama
नाशिक

Loksabha Election 2024 : नाशिकमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची माघार ?

Arvind Jadhav

Nashik News : जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार असताना त्यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीतून जवळपास माघार घेतली की काय, असे चित्र उभे राहिले आहे. पक्षफुटीनंतर नाशिक आणि दिंडोरीतील सर्वच आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. मात्र, अजित पवार गट सध्या शांत बसण्यास प्राधन्य देत आहे. यातून लोकसभेला तिलांजली देऊन विधानसभेच्या जागा पदरात पाडून घेण्याची अजित पवार गटाची रणनीती असू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

गेल्या तीन टर्मपासून राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सरळ लढत होणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात आता शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि भाजप यांच्यातच रस्सीखेच सुरू आहे. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा कोणताही उघड सहभाग अद्याप समोर आलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी अजित पवार शहर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी शिवाजी सहाणे यांची भेट घेऊन तुम्ही काम सुरू करा, असा निरोप दिला. मात्र, यानंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत. तर मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्ता मेळाव्यात नाशिकवर आमचा दावा असल्याचे सांगितले.

महायुतीतील ज्या पक्षाकडे जागा जाईल, त्या पक्षासाठी काम करण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी केले होते. मात्र, इतर पक्षांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीत अजित पवार गट किमान नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात खूपच पिछाडीवर असल्याचे दिसते.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने (ठाकरे गट) दावा केला आहे. तर, याच जागेसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आग्रही आहे. त्यामुळे अद्याप महाआघाडीतर्फे कोणता पक्ष रिंगणात उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. महायुतीपैकी शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्यात कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्याची स्थिती लक्षात घेता ही जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकते, असे चित्र दिसून येते. शिंदे गटाला मालेगाव, धुळे मतदार संघाचा पर्याय पुढे येऊ शकतो. अर्थात, यात पालकमंत्री दादा भुसेंची (Dada Bhuse) भूमिका महत्त्वाची आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पारंपरिक पद्धतीने भाजपा आणि राष्ट्रवादीतच लढाई होते. अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार याच मतदारसंघात असताना पक्षाने तलवार म्यान केल्याचे दिसून येते.

सध्या पक्षाचे चिन्ह, नाव आणि आमदारांवरील कारवाई याबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. त्यातून पक्ष बाहेर पडल्यानंतर थेट विधानसभेवर लक्ष केंद्रित करायचे. लोकसभेमध्ये होणारी हानी विधानसभेवेळी भरून काढता येईल. तसेच लोकसभेसाठी तडजोड केल्याने विधानसभेसाठी जास्त जागा घेता येतील, अशी रणनीती अजित पवारांनी (Ajit pawar) आखली असावी, अशी शक्यता आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT