Nashik BJP MLA Balasaheb Sanap
Nashik BJP MLA Balasaheb Sanap 
नाशिक

भाजप नगरसेवकांनी आमदार बाळासाहेब सानपांकडे फिरवली पाठ!

सरकारनामा ब्युरो

नाशिक  : विधानसभा निवडणूकीसाठी नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपच्या अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. यामध्ये नगरसेवक आघाडीवर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना समर्थकच मिळेनात बुहतांश नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली आहे. या मतदारसंघात भाजपकडे अडतीस नगरसेवक आहेत. मात्र, जे कालपर्यंत सानप यांच्याबरोबर फिरत होते त्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने सानप यांना उमेदवारी मिळणार का जाणार?, याची चर्चा जोरात आहे.

आमदार सानप यांच्यासमोर मतदारसंघात तब्बल सोळा इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. हे सर्वच सोळा इच्छुक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याभोवती रुंजी घालत असल्याने बाळासाहेब सानप यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले गणेश गिते आणि कमलेश बोडके यांनीच प्रतिस्पर्ध्यांना बळ दिल्याचे चित्र आहे. सानप यांचे समर्थन करणारे अनेक नगरसेवक आहेत. 

सद्यःस्थितीत चिरंजीव मच्छिंद्र सानप, पंचवटी प्रभाग समिती सभापती सुनीता पिंगळे, प्रियंका माने व नाशिक रोड प्रभाग समिती सभापती विशाल संगमनेरे आमदार सानप यांचे जोरदार समर्थन करत असल्याने पाच नगरसेवकांच्या शिरावर पंचवटीच्या गढीचा भार असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकीपासून सत्ता आल्यानंतर विविध पदांवर काम करण्याची संधी दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवक त्यांच्यापासून दुरावले आहेत. सानपांची पंचवटीतील गढी ढासळत असल्याचे चित्र सध्या पूर्व विधानसभा मतदारसंघात दिसते आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजपचे पहिले महापौर, आमदार, शहराध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. करताना त्यांनी स्वत:ची ताकद निर्माण केली. पंचवटी विभागात एकूण २४ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवक निवडून आल्याने या भागावर सानप यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले होते. 

कालांतराने राजकारणाच्या सारीपाटावर आमदार सानप यांचे फासे उलटे पडत गेल्याने त्यांच्या साम्राज्याला धक्के बसण्यास सुरवात झाली. भाजप गटनेते जगदीश पाटील, शांता हिरे, प्रा. सरिता सोनवणे व हेमंत शेट्टी यांनी सानप यांच्याविरोधात थोपटलेले दंड सानपांच्या साम्राज्याला तडा गेल्याचे ढळढळीत उदाहरण ठरले.

हे देखिल वाचा -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT