Raj Thakre Nashik Campaign Meeting
Raj Thakre Nashik Campaign Meeting 
नाशिक

शिवसेनेत माणसं आहेत की गोट्या? भाजपच्या मागे घरंगळताहेत : राज ठाकरेंची खोचक टिका

संपत देवगिरे

नाशिक : ''भाजपशी युती करुन पंचवीस वर्षे शिवसेना सडली. आज काय झाले? नाशिकमध्ये यांना एक जागा दिली नाही. इथल्या कार्यकर्त्यांनी करायचे काय? पुण्यात एक जागा दिली नाही. तरीही हे चाललेत घरंगळत. यांना काही स्वाभिमान आहे की नाही?'' असा प्रश्‍न करीत ''ही माणसं आहेत का गोट्या?'' असा खोचक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे विचारला.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर ठाकरे यांची सभा झाली. यावेळी नितीन भोसले (नाशिक मध्य), दिलीप दातीर (नाशिक पश्‍चिम), सिध्दांत मंडाले (देवळाली), योगेश शेवरे (इगतपुरी) आणि टी. के. बागूल (दिंडोरी) या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या भाषणात ते म्हणाले, ''आज एचएएल'चे कामगार माझ्याकडे आले होते. व्यथा सांगत होते. देशाचे संरक्षण करणारी विमाने जिथे बनवली जातात. तिथला आमचा कामगार रडतोय. त्याला पगार मिळत नाही. कारण हा एचएएल कोणाच्या तरी घशात घालण्याचे कारस्थान सुरु आहे. राफेलचे कंत्राट त्या अनिल अंबानीला दिले जाते. तरीही आम्ही थंड. निवडणुका लढायला काही तरी अर्थ आहे. ते उमेदवार निवडून जातील व काही तरी प्रखर काम करतील तेव्हा काही तरी अर्थ आहे. या भाषणाला काही तरी अर्थ आहे. अन्यथा सर्व काही निरर्थक ठरेल.''

ते पुढे म्हणाले, ''आज हेलीकॉप्टरने वैजापुरला जातांना मला सह्याद्री पहायला मिळाला. तो विशाल बाहु पसरलेला आपला सह्याद्री पाहिल्यावर उर भरुन येतो. ते पाहिल्यावर दिसते महाराष्ट्राला काय मिळाले आहे ते. तो काय सांगतो आहे. तो सांगतो आहे, जसा ताठ मनाने मी उभा आहे. तसेच तुम्ही उभे रहा. मात्र, महाराष्ट्र आज तसा दिसत नाही. ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे लावले तो महाराष्ट्र आज हतबल झालेला दिसतो आहे. ती मनगट आज स्वस्थ आहेत. सरकार येताहेत वेडीवाकडी वागताहेत. आम्ही थंड. दुसरी सरकार येतात. तसेच वागतात. तरीही आम्ही थंड. तुम्ही जागे व्हा. जागृत व्हा. मला सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा एक प्रखर विरोधक म्हणून महाराष्ट्रात भूमिका बजवायची आहे. त्यासाठी तुम्ही या उमेदवारांना साथ द्या.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT