Nashik BJP Leader Died after Jumping from Fourth Floor
Nashik BJP Leader Died after Jumping from Fourth Floor 
नाशिक

पोलिसांनी अटक केलेले भाजप नेते विजय बिरारींचा चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याने मृत्यू

सरकारनामा ब्युरो

नाशिक  : हैदराबादमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेतील संशयिताकडून चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे प्रदेश चिटणीस विजय बिरारी यांना तेलगंणा पोलिसांनी अटक केली. त्यांचा तपास सुरु असतानाच त्यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्ते, सराफ व्यवसायिकांत खळबळ उडाली.

हैदराबादमध्ये शंभरहून अधिक चोऱ्या करणारा सराईत घरफोड्या प्रकाश नागेश शिंदे यास तेलंगणा पोलिसांनी 10 फेब्रुवारीला अटक केली होती. त्याने चोरीचे सोने पंचवटीतील श्री भगवती ज्वेलर्सचे विजय बिरारी यांना विकल्याची कबुली दिली. त्यामुळे बिरारी यांना ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसांपासून तेलंगणा पोलिस नाशिकमध्ये आले होते. सोमवारी (ता.24) त्यांनी बिरारींना ताब्यात घेतले व चोरीच्या मुद्देमालाच्या रिकव्हरीसाठी शासकीय विश्रागृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत चौकशी सुरू होती. मात्र, या वेळी बिरारी यांनी पोलिसांची नजर चुकवून चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

श्री. बिरारी हे भारतीय जनता पक्षाच्या व्यापरी सेलचे प्रदेशसरचिटणीस होते. त्यांचे भाजपच्या विविध वरिष्ठ नेत्यांशी संबंध होते. विशेषतः माजी मंत्री गिरीष महाजन यांचे ते निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या घटनेनंतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे चौकशीसाठी गर्दी केली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तेलंगणा पोलिसांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सराफ असोसिएशनतर्फे आज (ता. 26) बंदची हाक दिली आहे. तसेच, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.

तेलंगणा पोलिस सोमवारी दुपारी दुकानात येऊन काका विजय बिरारी व कारागिराला घेऊन गेले. दुकानातील सोन्याचा माल, रोकडही नेली. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ दिला नाही. बिरारी यांना मारहाण करण्यात आली. या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे -अंकुश बिरारी, (मृत बिरारी यांचा पुतण्या)

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बिरारी यांचा मृत्यू झाल्याने, अशा गुन्ह्यांचा तपास सीआयडी करते. त्यानुसार सीआयडी तपास करणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पार करण्यासाठी सहकार्य करावे -विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT