Nashik BJP Office Bearers Resign Over CAA
Nashik BJP Office Bearers Resign Over CAA 
नाशिक

नाशिकमध्ये भाजपच्या २२ पदाधिकाऱ्यांचा राजीनामे देत 'सीएए' विरोधात मोर्चा

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान चौधरी यांच्यासह बावीस जणांनी पदाचे सामुदायिक राजीनामे दिले. भाजप सरकार मनमानी कारभार चालवित आहे. एनआरसी आणि सीएए कायद्याचा घाट घालून अल्पसंख्याक समाजाचा छळ चालविला आहे. दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे, असे सांगत त्यांनी  राजीनामे देत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

वडाळा रोड येथील श्री. चौधरी यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते म्हणाले, "भाजपने निवडणुकीच्या वेळी 'सबका साथ, सबका विकास', असा मंत्र दिला होता. त्यांच्या या विचाराने प्रेरित होऊन आम्ही भाजपमध्ये सक्रिय झालो. त्यांनी तो विचार बाजूला सारत त्यांची मनमानी (हिटलरशाही) चालविली आहे. तीन तलाक, 370 कलम हटविणे, एनआरसी, सीएएसारखे संविधानविरोधी कायदे लागू करण्याचा घाट घालत आहे. आपल्याच देशात आपण सुरक्षित नाही, असे अल्पसंख्याकांना वाटू लागले आहे. असे असताना आज ना उद्या भाजप सरकारला त्यांची चूक लक्षात येईल. ते कायदे मागे घेतील, असे वाटत होते. या कायद्यासंदर्भात त्यांनी मुंबई येथे आमची बैठक घेतली. त्या वेळीही आम्ही विरोध केला. तरी त्यांनी कायदे मागे घेतले नाही.'' 

यावेळी प्रदेश सचिव, शहर उपाध्यक्ष, शहर सचिव, माजी शहराध्यक्ष यांच्यासह बावीस जणांनी पदाचे सामुदायिक राजीनामे दिल्याचे घोषित केले. देशात जातीयवाद निर्माण करणे, निवडणुका कशा जिंकाव्यात हे दोन कार्य त्यांच्याकडून केले जात आहे. मध्यवर्ती निवडणुका लागल्या, तर त्यांचा निश्‍चित पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत यापुढे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन एनआरसी आणि सीएएविरोधात लढा देणार असून राज्यभर दौरे करून नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही ते म्हणाले. वसीउल्ला चौधरी, हाशिम वारसी, अब्दुल खान, अहमद काझी, राजेश सोनार, नंदू इंगोले, प्रवीण निन्ने, नसीम चौधरी, तारीक सय्यद, अकबर खान, रफिक अन्सारी, मुबारक खान, जावेद खान आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

'एनआरसी' आणि 'सीएए'ला काही राज्यांनी विरोध केला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात हे कायदे लागू करू नयेत, अशी मागणी घेऊन राजीनामे दिलेले सर्व जण लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही श्री. चौधरी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT