Pankaj Bhujbal-Suhas Kande 
नाशिक

नांदगावमध्ये चर्चा फक्त पंकज भुजबळांच्या इनिंगची अन् शिवसेना उमेदवारांतील अस्वस्थतेची

इच्छुकांच्या गर्दीने नांदगाव मतदारसंघाचे राजकारण ढवळून निघाले तरी भुजबळांच्या शिवसेनेतल्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे मात्र इच्छुकांच्या गोटात व राजकीय पातळीवर निर्माण झालेली संभ्रमावस्था कायम आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघात आमदारकी वगळता सगळ्या सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहेत रेडिमेड कार्यकर्त्यांची मोठी फौज व 1990 पासून विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत किमान वीस हजाराचे मिळणारे मताधिक्य ही शिवसेनेच्या दृष्टीने कायम जमेची बाजू राहिलेली आहे.

संजीव निकम

नाशिक  : शिवसेनेच्या इच्छुकांनी निवडणुकीची तयारी केली खरी मात्र लगेचच भुजबळ आणि शिवसेना या समीकरणाची चर्चाही सुसाट पुढे आली. त्यामुळे पुन्हा एकदा पंकज भुजबळ चर्चेच्या केंद्रस्थानी आली. यात शिवसेनेचे इच्छुक आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता कोणाच्या पत्त्यावर पडते याचीच उत्सुकता आहे. 

इच्छुकांच्या गर्दीने नांदगाव मतदारसंघाचे राजकारण ढवळून निघाले तरी भुजबळांच्या शिवसेनेतल्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे मात्र इच्छुकांच्या गोटात व राजकीय पातळीवर निर्माण झालेली संभ्रमावस्था कायम आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघात आमदारकी वगळता सगळ्या सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहेत रेडिमेड कार्यकर्त्यांची मोठी फौज व 1990 पासून विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत किमान वीस हजाराचे मिळणारे मताधिक्य ही शिवसेनेच्या दृष्टीने कायम जमेची बाजू राहिलेली आहे. त्यामुळे या मतदार संघात भुजबळांच्या संभाव्य प्रवेशाचे परिणाम काय असू शकतील याचीच चर्चा होतांना दिसते. 

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सुहास कांदे दुसऱ्या क्रमांकावर होते पराभूत झाल्यापासून त्यांनी सातत्याने मतदार संघातल्या जनतेशी ठेवलेला जनसंपर्क व केलेली तयारी याची तुलना या कथित पक्षप्रवेशाशी होतांना दिसते ज्यांच्यामुळे पराभूत झालो त्यांनाच पक्षात प्रवेश मिळणार असेल तर उमेदवारीचा गुंता मातोश्री वरून कशा रीतीने सुटू शकतो याकडे शिवसेनेसोबतच भुजबळ विरोधकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीला भुजबळ सोडचिट्ठी देणार की नाही दिली तर पंकज भुजबळ यांना उमेदवारी मिळणार का अन मिळाली तर वर्षानुवर्षे केलेल्या तयारीचे काय होणार याबद्दलची अस्वस्थता शिवसेनेच्या वर्तुळात होतांना दिसते. 

मुळातच शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या नांदगाव मतदार संघात अद्वय हिरे यांच्या निमित्ताने भाजपाची झालेली एंट्री हेच आव्हान होते त्यातच शिवसेना भाजपा वेगवेगळे लढलेत त्यात दुसऱ्या क्रमांकावर अवघ्या चारशे साडेचारशे मताचा फरक होता तेव्हापासून भाजपाची दावेदारी वाढल्याचे दिसून येते पंकज भुजबळ यांच्या सलग दुसऱ्यांदा विजयी होण्यात मनमाड शहराचा मोठा हिस्सा राहिलेला होता. किंबहुना, मनमाडमुळे पंकज यांचा सलग दुसरा विजय सुलभ झाला होता. 

अलीकडच्या काळात पंकज भुजबळ यांच्यापासून स्वपक्षातली मंडळी दूर गेल्याने त्यांच्या समोर पर्यायी व्यवस्था उभे करण्याचे आव्हान होते. मात्र, एकूणच पक्षप्रवेशाच्या चर्चेमुळे पंकज यांची दावेदारी व त्यातून निर्माण होणारे पडसाद हे अधिकृतरीत्या स्पष्ट व्हायचे बाकी आहे. त्यातून बेरजेचे किती व वजावटीचे किती याचा संभ्रम मात्र तयार झाला आहे पंकज भुजबळ राष्ट्रवादी सोडणार नाहीत असाही मतप्रवाह असला, तरी दुसरीकडे दबावतंत्राचा तो भाग असू शकतो, असे मानणारा देखील एक मोठा वर्ग आहे. त्यांची शिवसेनेतली एंट्री झाली तर त्यांच्या रिकाम्या झालेला राष्ट्रवादीच्या जागेवरच नवा चेहरा कोण असणार यालाही महत्व असणार आहे. 

सध्या सनदी अधिकारी बाजीराव शिंदे यांचे नाव त्यादृष्टीने आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत वेगवेगळे लढलेल्या शिवसेना भाजपा महायुती होणार की नाही, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेकडून आज तरी सुहास कांदे हेच एकमेव प्रबळ दावेदार आहेत. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदगावमध्ये येऊन त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याने कांदे यांच्या तयारीला जोर चढलेला आहे. मात्र, भाजपनेही नांदगाववरचा दावा सोडलेला नसल्याने त्यांच्याकडील इच्छुकांच्या यादीत मनीषा पवार,रत्नाकर पवार माजी आमदार संजय पवार पंकज खताळ अशी नावे चर्चेत आहेत.

महायुती झाली तरच भुजबळांचा पक्षप्रवेश असेल असे राजकीय वर्तुळात दावा करणाऱ्यांचा एक गट आहे. शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला, याचा संभ्रम कायम असला तरी सुहास कांदे यांना श्रेष्टींबद्दल योग्य निर्णयाचा आत्मविश्वास आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पवार दाम्पत्याने विविध विकासकामांच्या योजनांचा सुरु केलेला पाठपुरावा दुर्लक्षित करता येणार नाही. भुजबळांच्या संभाव्य पक्ष प्रवेशानंतर मतदार संघातील राजकीय चित्र अधिकपणे स्पष्ट होईल. या सर्व रणधुमाळीत माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांच्या काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवाय राष्ट्रवादीपासून अलिप्त झालेले जेष्ठ नेते साहेबराव पाटील,दिलीप इनामदार अरुण पाटील व संतोष गुप्ता ही नेतेमंडळी भुजबळ विरोध या सामान मुद्दयांवर अॅड. अनिल आहेर यांच्यासोबतच आहेत. 

जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आहेत माजी आमदार जगन्नाथ धात्रक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे हे देखील सध्या शिवसेनेत आहेत. कवडे-हिरे-धात्रक या त्रयींमुळे शिवसेनेला अच्छे दिन आहेत. भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी अंतिमतः पालकमंत्री महाजन यांचा शब्द अखेरचा ठरणार आहे. मनमाडच्या माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारेनी पंकज भुजबळ यांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवल्याने बहुजन वंचित आघाडीची ती सूचक घटना आहे
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT