nashik market yard political tussle between shivaji chumbhale and sampat sakale
nashik market yard political tussle between shivaji chumbhale and sampat sakale 
नाशिक

नाशिक बाजार समिती : शिवसेना नेते, सभापती शिवाजी चुंभळेंकडून संचालकांना मारहाण? 

सरकारनामा ब्युरो

नाशिक ः मोठी उलाढाल असलेल्या नाशिक बाजार समितीचे सभापती व शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांचे अधिकार दोन दिवसांपूर्वी काढून घेण्यात आले. आज बारा संचालकांनी त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला. त्यामुळे संतप्त झालेल्या चुंभळे यांनी कॉंग्रेस नेते संपतराव सकाळे यांनी ठराव दाखल करु नये यासाठी दहशत निर्माण केली अशी तक्रार आहे. दरम्यान श्री. चुंभळे यांच्या पत्नीनेही या संचालकांविरोधात असभ्य वर्तनाची तक्रार केली आहे. दोन्ही बाजुंची तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे. 

यासंदर्भात कॉंग्रेस नेते संपतराव सकाळे यांसह अन्य अकरा संचालकांनी श्री. चुंभळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीसह जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयात काही काळ तणाव होता. आज दुपारी कॉंग्रेस नेते श्री. सकाळे यांच्या नेतृत्वाखाली अन्य अकरा संचालकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सभापती श्री. चुंभळे यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दिला. त्यानंतर हे संचालक सहकार उपनिबंधक कार्यालयात गेले. त्याची याची कुणकुण लागताच श्री. चुंभळे आपल्या समर्थकांसह तेथे पोहचले. त्यांनी अन्य संचालकांना अपशब्द वापरण्यास सुरवात केली. त्यानंतर श्री. सकाळे यांनी अविश्‍वास प्रस्ताव देऊ नये यासाठी दमबाजी करण्यास सुरवात केली. मात्र संचालकांनी त्याला न जुमनता प्रस्ताव दाखल केलाच. त्याचा राग आल्याने श्री. चुंभळे यांनी काहींना धक्काबुक्की करीत मारहाण करीत तणाव निर्माण केला अशी लिखीत तक्रार या संचालकांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात केली. 

पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असतांना श्री. चुंभळे यांच्या पत्नी तेथे दाखल झाल्या. त्यांनी श्री. सकाळे यांनी आपल्या पतीकडून 15 लाख रुपये घेतले आहेत. त्यांनी आपल्याला संबंधीत संचालकांनी असभ्य वर्तन करुन अपशब्द वापरले. पैसे परत मागीतल्यावर पैसे देण्यास नकार दिला अशी तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही बाजुंची तक्रार दाखल करण्याचे काम सुरु केले आहे. 

गेले काही दिवस बाजार समितीचा राजकीय वाद वाढत आहे. श्री. चुंभळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात होते. त्यांनी महापालिका निवडणूकीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आपल्याला अडचणीत आणले जात आहे असा आरोप केला. श्री. चुंभळे यांनी कर्मचाऱ्याकडून नियुक्तीसाठी लाच घेतली अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे होती. त्यात रचलेल्या सापळ्यात चुंभळे यांना पैसे घेतांना अटक करण्यात आली होती. हा गुन्हा दाखल झाल्याने सहकार उपनिबंधकांनी त्याचे पद काढून घेण्याचा पत्र दिले होते. त्यावरुन या दोन्ही गटांत वाद सुरु होते. त्याचे पर्यावसान आज हाणामारी व अविश्‍वास प्रस्तावात झाले. बाजार समितीच्या संचालकांना यापूर्वीही चुंभळे समर्थक व मुलाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. एकंदरच आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या बाजार समितीत शिवसेना व कॉंग्रेससह त्यांच्या समर्थकांत हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT