Nashik NCP Mla Narhari Zirwal Changes his Sytle for Escape From BJP
Nashik NCP Mla Narhari Zirwal Changes his Sytle for Escape From BJP 
नाशिक

आमदार नरहरी झीरवळांचे वेषांतर करुन गुडगावातील सुटका म्हणजे भाजपवरील सर्जीकल स्ट्राईकच!

संपत देवगिरे

नाशिक : "माझ्यासह राष्ट्रवादीच्या चौघा आमदारांना गुडगावच्या द ऑबेरॉय होॅटेलात ठेवले होते. खोलीबाहेर भाजपच्या शंभर जणांचा पहारा होता. तेथून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी माझे वेषांतर करुन माझी सुटका केली. ही सुटका अक्षरशः भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वरील 'सर्जीकल स्ट्राईक' होता'' असे आमदार नरहरी झीरवाळ यांनी येथे सांगीतले.

या सुटकेची अतिशय रंजक माहिती बाहेर आली आहे. स्वतः नरहरी झीरवाळ यांनीच आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली. 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यावेळी मुंबईत असलेल्या नाशिकच्या आमदार नरहरी झीरवाळ, नितीन पवार यांना वरिष्ठांच्या सुचना आहेत, तुम्ही दिल्लीला जायचे आहे असा निरोप आला. त्याप्रमाणे दौलत दरोडा आणि धुळ्याचे पाटील असे चार आमदार विमानाने दिल्लीला गेले. तेथे त्यांना गुडगावच्या द ऑबेरॉय हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. 

ते गेल्यानंतर लगेचच तेथे भाजपचे जिल्हा अध्यक्ष भुपेंद्र चौहान व त्यांच्या सुमारे शंभर जणांचा पहारा सुरु झाला. आमदारांना खोलीबाहेर पडणेही शक्‍य नव्हते. वाहिन्यांवरील बातम्यांतुन सर्व चित्र स्पष्ट झाल्याने आमदार नितीन पाटील यांनी मुंबईला शरद पवार यांच्याशी संपर्क केला. ऑबेरॉय हॉटेल हे नाव वगळता आपण कुठे आहोत, हे देखील सांगता येत नव्हते. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी एक स्वीय सहाय्यक गेले. मात्र, त्यांना धक्काबुक्की करुन दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य उमगले.

त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहा यांना निरोप मिळाला. त्यांनी व त्यांच्या विद्यार्थी सहकाऱ्यांनी हे हॉटेल शोधले. ते पाचव्या उद्योग विहार इमारतीत मजल्यावर होते. तेथे भाजपचा मोठा फौजफाटा पाहिल्यावर त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज शर्मा यांना सुचना केली. या दोघांनी तीस, चाळीस कार्यकर्त्यांची जमवाजमव केली. आठ गाड्या ठिकठिकाणी तयार ठेवल्या. पाचव्या मजल्यावर दोन खोल्या आरक्षीत केल्या. तेथून जेव्हा पहाऱ्यावरील कार्यकर्ते चहा, नाष्त्यासाठी पांगले तेव्हा मध्यरात्री गुपचुप दौलत दरोडा व नितीन पवार या आमदारांना अग्नीशामक दलासाठी केलेल्या आपत्कालीन मागच्या दाराने त्यांना बाहेर काढले. रात्री पावणेतीनच्या विमानाने मुंबईला पाठवले. त्यानंतर आणखी एक आमदाराला बाहेर काढले.

आमदार नरहरी झीरवाळ हे किर्तनकार आहेत. ते बंडी, पायजामा व गांधीटोपी परिधान करतात. त्यांनी पॅंट, इनशर्ट, केस मागे वळवलेले, क्‍लीन शेव्ह असे वेषांतर केले. त्यांना सरळ मुख्य प्रवेशद्वारातुन बाहेर नेण्याचा प्रयत्न झाला. ते बाहेर पडत असतांना पहाऱ्यावरच्या मंडळींच्या ते लक्षात आले. तेव्हा राष्ट्रवादी कार्यकर्ते व त्यांच्यात झटापट झाली. यात ते अतिशय चपळाईने कारमध्ये बसले. ही गाडी थोडी पुढे गेल्यावर लगेचच दुसऱ्या गाडीत बसले. असे तीन वेळा गाड्या बदलुन ने शरद पवार यांच्या निवास्सथानी पोहोचले. 

तिथे नाशिकचे कैलास मुदलीयार व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर दिल्लीच्या काही कार्यकर्त्यांसह ते विमानाने मुंबईला पोहोचले. या सर्व प्रकारात पहाऱ्यावर असलेल्या शंभर जणांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी गुडगाव येथून केलेली सुटका एकप्रकारे भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर 'सर्जीकल स्ट्राईक' होता अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT