Sanjay Raut Shivsena
Sanjay Raut Shivsena 
नाशिक

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक राहिले आहेत का हे मी शोधतोय : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो

नाशिक : "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची जनतेने काय अवस्था केली याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. या निवडणुकीनंतर राज्यात विरोधक आहेत काय हे मी शोधतो आहे. राज्यात चार वर्षे विरोधकांची भूमिका शिवसेनेनं घेतली, तेव्हा हे विरोधक कुठे झोपले होते का?" असा चिमटा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षांना उद्देशून काढला.

एका खासगी कार्यक्रमासाठी आज ते नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''विरोधकांचे पक्ष आहे तरी कुठे हे मी शोधतोय. काही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळत नाही, त्यांनी जाहिरात दिलीय अध्यक्ष पाहिजेत. काही थोडेफार राहिलेले पक्ष दिसताहेत. ते येत्या दहा पंधरा दिवसात शिवसेना, भाजपात विलीन झालेले दिसतील."

हे देखिल वाचा -

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना नेहमी आवाज उठवते, सत्तेत असो व नसो आम्ही ते करीत राहणार असा दावा त्यांनी केला. ''पीकविम्याविषयी ज्या त्रुटी असतील त्या दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेनं भूमिका घेतली, सत्तेत असूनही पीक विमा कंपन्यांच्या विरोधात गेलो आहोत. राजू शेट्टी यांनी स्वतः आंदोलनात सहभागी व्हावे नाहीतर स्वतः आंदोलन करावे.  राजू शेट्टीना लोकसभेत जनतेनं त्यांना घरी पाठवलं आहे हे त्यांनी विसरू नये.'' असा टोलाही त्यांनी लगावला.

आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने काय केलं, असे विचारून राऊत म्हणाले, "अनेक सरकार ही काँग्रेस पक्षाने पाडली आहेत, राजकारणात ह्या गोष्टी अपरिहार्य आहेत. काँग्रेस पक्षातील आमदार का फुटताहेत कर्नाटक मधील सरकार का अस्थिर आहे, याचे आत्मचिंतन राहुल गांधी यांनी करायला हवं. स्वतः राहुल गांधी यांनी  नेतृत्वापासून पलायन केले आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT