नाशिक

नाशिक : प्रभाग समिती सभापती निवडणुकीत मनसेची मदत घेत भाजपचा शिवसेनेला ठेंगा?

सरकारनामा ब्युरो

नाशिक : राज्यात अन् देशात शिवसेना, भाजपची युती झाली आहे. मात्र ही युती महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांत अद्याप झिरपलेली नाही. त्याचा प्रत्यय नाशिक महापालिकेत आला. संख्याबळाच्या जोरावर भाजपने सहा पैकी चार सभापती केले. मनसेची मदत घेत शिवसेनेला रोखून पाचवा सभापती देखील भाजपचाच होणारआहे. थोडक्यात भाजपने शिवसेनेची अपेक्षा धुडकावत त्यांना ठेंगा दाखवला आहे.   

यंदाच्या प्रभाग समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी पूर्व, पंचवटी, नाशिक रोड व सिडको प्रभाग समित्यांमध्ये भाजपच्या सदस्यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे  येथील सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या पूर्व विभागातून सुमन भालेराव, पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी सुनीता पिंगळे, नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदी विशाल संगमनेरे, तर सिडको प्रभाग समिती सभापतिपदी दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होऊन सभापतिपदाची घोषणा होण्याची फक्त औपचारिकता राहिली आहे.

येत्या शुक्रवारी (ता. 5) व शनिवारी (ता. 6) प्रभाग समिती सभापतिपदाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापूर्वी बुधवारी (ता. 3) अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी दोनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार भाजपतर्फे चार प्रभाग समित्यांसाठी अर्ज दाखल करण्यात आले.

सातपूर प्रभाग समिती सभापतिपदासाठी सातपूर विभागातून हेमलता कांडेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेवर प्रभाग समितीची सत्ता अवलंबून राहणार आहे. सातपूर विभागातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपने युतीचा धर्म पाळावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपने मनसेला, तर यंदा मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याने सभापतिपदासाठी उमेदवार उभे केल्याचा दावा भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी केला. पश्‍चिम प्रभाग समिती सभापतिपदासाठी कॉंग्रेसच्या वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर मनसेच्या अॅड. वैशाली भोसले यांनीही अर्ज दाखल केला आहे.

मनसे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT