NCP Women Wing President Roopali Chkankar Visited Farms in Dhule District
NCP Women Wing President Roopali Chkankar Visited Farms in Dhule District 
नाशिक

व्हाॅट्सअॅपव्दारे पिकांचा पंचनामा पाहून रूपाली चाकणकर चक्रावल्या

निखिल सूर्यवंशी

धुळे : अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त पिकांचा व्हाॅट्सअॅपव्दारे पंचनामा होऊ शकतो का? तर होय, होऊ शकतो. जिल्ह्यातील बळसाणे येथील तलाठी महोदयांनी ही करामत करून दाखवली आहे. दौ-यात ते पाहून चक्रावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या अजब प्रकाराची पोलखोल करत सरकारी यंत्रणेच्या कारभाराचा पंचनामाच येथे केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर शुक्रवारी (ता. 15) जिल्हा दौ-यावर होत्या. त्यांनी देशभरातील जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असलेल्या बळसाणे (ता. साक्री, जि. धुळे) येथे दुपारनंतर भेट दिली. 
परतीच्या पावसासह अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती चाकणकर यांनी बळसाणेसह विविध गावातील पीडित शेतकरी व समस्याग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी जागोजागी अतिवृष्टीमुळे  शेतमालाचे झालेले नुकसान आणि त्यामुळे हतबल झालेल्या शेतक-यांसह ग्रामस्थ महिलांशी संवाद साधताना चाकणकर गंभीर झाल्या

बळसाणे येथे तलाठ्याने नुकसानग्रस्त शेतात जाऊन पिकांचा पंचनामा करण्याऐवजी चक्क व्हाॅटस्अॅपवर 'पंचनामा ग्रुप, बळसाणे",  असा ग्रुप सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीमती चाकणकर यांच्या दौ-यात उजेडात आला. त्या ग्रुपमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त शेताचे व पिकाचे फोटो पोस्ट करायचे, अशी अनाकलनीय करामत तलाठ्याने केली. राज्यात असा अजबच प्रकार येथे पहायला मिळाल्याने चाकणकर चक्रावल्या आणि संतप्त झाल्या. 

विविध कारणांनी रोज संकटाशी मुकाबला करणा-या शेतक-याच्या शेतात जाऊन पंचनामा करण्याऐवजी तलाठ्याने ही कोणती पद्धत अमलात आणली आणि त्याचे असे धाडस कशामुळे झाले, असा प्रश्न श्रीमती चाकणकर यांना पडला. तसेच ज्या शेतक-याकडे मोबाईलच नसेल त्याने फोटो कसे पोस्ट करायचे, त्याच्या नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा कसा होऊ शकेल, संबंधित पीडित शेतक-याला कसा न्याय मिळेल, असे संतप्त प्रश्न उपस्थित करत चाकणकर यांनी स्थानिक सरकारी यंत्रणेच्या विचित्र कारभाराचा शेतकरी, अन्य ग्रामस्थां समक्ष पंचनामा केला. तसेच शेतात जाऊन यंत्रणेने पंचनामे करावे, अशी मागणी केली. 

या संदर्भात पीडित शेतक-यांच्या न्यायासाठी पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे चाकणकर यांनी  'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या अशा विचित्र कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतक-यांपाठोपाठ ग्रामस्थांनी वीज, पाणी, रस्ते, रोजगारासंबंधी समस्या चाकणकर यांच्यापुढे मांडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT