No Confidence Motion against Shivaji Chumbhle Passed
No Confidence Motion against Shivaji Chumbhle Passed 
नाशिक

छगन भुजबळांवर आरोप करणाऱ्या  शिवाजी चुंभळेंविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर

सरकारनामा ब्युरो

नाशिक : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात राजकीय आरोप करणारे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, शिवसेना नेते शिवाजी चुंभळे विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. गेले अडीच वर्षे सभापती असलेले चुंभळे पोलिस तक्रारी, संचालकांसह कर्मचाऱ्यांबरोबर मारामाऱ्यांमुळे सतत वादग्रस्त ठरले होते.

राज्यातील आघाडीच्या नाशिक बाजार समितीच्या संचालकांनी चुंभळे यांच्या विरोधात बंड पुकारले होते. जिल्हा उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारी नुसार त्यांचे सह्यांचे अधिकार काढून ते संचालक संपतराव सकाळे यांच्याकडे देण्यात आले होते. सभापतीपदावरून चुंभळे यांना काढण्यासाठी अविश्वासाचा ठरावासाठी संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र दिले. त्यावेळी हे संचालक व श्री. चुंभळे यांच्यात मारामारी झाली होती. यावेळी चुंभळे व त्यांच्या निकटवर्तीयांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अप्रत्यक्षपणे त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वच नाराज संचालक एकत्र आल्याने काल अविश्‍वास ठरावावेळी ते तिकडे फिरकलेही नाही. 

बाजार समिंतीचे संचालक सहलीवर निघून गेले. ते रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले.अविश्वासाच्या ठरावाची प्रक्रिया वाजता सुरू होणार होती. त्याच्या एक तास अगोदर हे संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, दिलीप थेटे, संजय तुंगार, श्‍यामराव गावित, शंकरराव धनवटे, ताराबाई माळेकर, विमलबाई जुंद्रे, रवींद्र भोये, प्रभाकर मुळाणे, भाऊसाहेब खांडबहाले हे सहलीवर गेलेले संचालक हजर झाले. 

पावणे अकराच्या सुमारास चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील हजर झाले. बैठक सुरू झाली तेव्हा संचालक हजर होते. चुंभळे बैठकीला आले नाही. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने चुंभळेना पायउतार व्हावे लागले. अविश्वासाचा ठरावासाठी मतदान होणार असल्याने बाजार समितीच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या चार व्हॅन आणण्यात आल्या होत्या. बाजार समितीच्या कार्यालयाच्या भोवती बॅरिकेटस्‌ लावण्यात आले होते. त्याच्या भोवती कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. 

माझ्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत मार्केट कमिटीवर असलेल्या कर्जाची परतफेड करुन बाजारसमिती कर्जमुक्त केली. माझ्या विरोधात सुडबुद्धीचे राजकारण सुरू आहे - शिवाजी चुंभळे, माजी सभापती.

चुंभळे यांच्या गुंडा गर्दीला व्यापारी, शेतकरी कंटाळले होते. संचालकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर केला - संपत सकाळे, संचालक, बाजार समिती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT