नाशिक

प्रीतम मुंडे म्हणतात....गोपीनाथ मुंडेंनाही उशीर व्हायचा, मलाही उशीरच होतो!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : मंत्री पंकजा मुंडे असो वा खासदार प्रीतम मुंडे दोघींनाही (कै) गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्याचा त्या आवर्जुन उल्लेख करतात. मात्र कधी कधी असे करताना विनोदही घडतात. येथील व्ही. एन. नाईक संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी हा उल्लेख करतांना ''गोपीनाथ मुंडे साहेबांना कार्यक्रमांना पोहोचायला उशीर व्हायचा. तसाच मलाही उशीर होतो. पण काय करु? मै देर करती नही, देर हो जाती है'' असे वक्तव्य केले. त्याला श्रोत्यांकडून चांगलीच दाद मिळाली.

येथील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशाश्‍त्र महाविद्यालयाचे उद्‌घाटन खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते झाले. खासदार मुंडे यांचे माहेर बीड तर सासर नाशिक. नाईक संस्था ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करते त्या समाजाचे नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांना आदराचे स्थान आहे. हा संदर्भ लक्षात घेता या कार्यक्रमाला समाजाचे सर्वच घटक व राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. खासदार मुंडे यांना कार्यक्रमास येण्यास विलंब झाला. या पार्श्‍वभूमीवर त्या म्हणाल्या, ''खरे तर मी कार्यक्रमांना वेळेत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करते. मात्र विविध कारणांनी उशीर होतोच. गोपीनाथ मुंडे देखील कार्यक्रमांना उशीरा पोहोचत. अगदी तसाच मलाही उशीर होतो. तुम्ही कुटुंबातील मंडळी आहात सांभाळून घ्या. काय करणार मै देर करती नही. देर हो जाती है."

सासर- माहेर यांचा उल्लेख करतांना त्या म्हणाल्या की, मी बीडची आहे. मात्र माझे सासर नाशिक असल्याने ते माझे हक्काचे घर आहे. त्यादृष्टीने तुमच्या महाविद्यालयात माझ्यासाठी आरक्षण ठेवले पाहिजे. असे सांगत त्यांनी (कै) मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार या नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार झाला. 

संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, प्रभाकर धात्रक, माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, आमदार सर्वश्री बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, किशोर दराडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT