Tukaram Mundhe- Radhakrishna Game
Tukaram Mundhe- Radhakrishna Game 
नाशिक

आयुक्त निवासस्थानावरून तुकाराम मुंढे आणि राधाकृष्ण गमे यांच्यांत जुंपली 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरुन अवघ्या नऊ महिन्यांत मुंबईला बदली झाली. मात्र मुलाचे शिक्षण सुरु असल्याने त्यांचे कुटुंबीय अद्याप नाशिकलाच आहे. त्यांनी आयुक्तांचे निवासस्थान सोडलेले नाही. त्याविरोधात महापालिकेचे विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थेट राज्याच्या प्रधान सचिवांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शासकीय नियमांचा आधार घेत या दोन्ही आयुक्तांत जुंपण्याची शक्‍यता आहे. 

आयुक्तपदाच्या नऊ महिने 13 दिवसांच्या कारकीर्दीनंतर तुकाराम मुंढे यांची नोव्हेंबर 2018 मध्ये शासनाने मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली केली. परंतु मुंढे तेथे रुजू झाले नाहीत. अर्थमंत्रालयाने मुंढे यांच्या नियुक्तीला विरोध केल्याचे बोलले जाते. त्यानंतर शासनाने त्यांची एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. मात्र, मुंढे मुंबईला गेले तरी त्यांची मुलांचे शिक्षण नाशिकच्या शाळेत सुरु आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब नाशिकमध्येच आहे. 

या दरम्यान आयुक्तपदी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाली. गमे आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर महापालिका आयुक्तांसाठीच्या निवासस्थान मिळावे म्हणुन त्यांनी प्रयत्न केले. मुलांच्या शिक्षणामुळे मार्च 2019 पर्यंत आयुक्त निवासस्थानात राहू देण्याची विनंती मुंढे यांनी शासनाकडे केली आहे. त्यासाठी शासन निर्णयाचा आधार घेतल्याने शासनाकडूनदेखील विनंती मान्य करण्यात आली. परंतू, विद्यमान आयुक्त गमे यांनादेखील निवासस्थान हवे असल्याने त्यांनी प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. 

शासनाने प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी नियमावली केली आहे. अन्य ठिकाणी बदली झाली असली तरी मुलांच्या शिक्षणामुळे निवासस्थानाचा ताबा ठेवता येऊ शकतो. त्याच निर्णयाचा आधार मुंढे यांनी घेतला. परंतू, आयुक्त गमे यांनी मुंढे यांनी ज्या निर्णयाचा आधार घेतला आहे, तो निर्णय फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींनाच लागू होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानावरुन दोन अधिकाऱ्यांत चांगलीच जुंपल्याने राजकीय नेत्यांना चघळण्यासाठी एक नवा विषय मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT