Unrest in Nashik Shivsena Corporators
Unrest in Nashik Shivsena Corporators 
नाशिक

नाशिकच्या स्थायीचा वाद शिवसेनेकडून एकनाथ शिंदेच्या दरबारात

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महापालिकेतील 'मलईदार' पदे सातत्याने ठराविक नगरसेवकांनाच मिळतात. त्यामुळे नगरसेवकांतील नाराजीचा काल स्फोट झाला. सुधाकर बडगुजर आणि सत्यभामा गाडेकर यांनाच सातत्याने पदे मिळाल्याची नाराजी व्यक्त करीत नगरसेवकांच्या भावनांचा स्फोट झाला. त्यामुळे मुंबईहून पाठविलेले पदाधिकारी निरुत्तर झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याचा कसा सामना करावा असा प्रश्‍न पडला. आता यासंदर्भात महापौरांविरोधात शिवसेना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे दाद मागणार आहे.

महासभेत अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या असलेल्या एकीला नगरसेवकांच्या नाराजीतून जोरदार तडाखा बसला. स्थायी समितीवर सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांची नावे आल्याने ठराविक लोकांभोवतीच पदे फिरत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी बंडाचे हत्यार उपसले. भाजपच्या बंडखोरीवर हसणाऱ्या शिवसेनेलाच येत्या काळात गळती लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. स्थायी समिती सदस्यत्त्वासाठी बोलाविलेल्या विशेष महासभेत शिवसेनेकडून नावे जाहीर करताना महापौरपदाच्या शर्यतीतील माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांची नावे जाहीर झाली.

तौलनिक संख्याबळाच्या आधारे एका अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करण्याची शिवसेनेची मागणी होती. त्यानुसार ज्योती खोले यांचे नाव तिसऱ्या सदस्यासाठी देण्यात आले होते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी बडगुजर व गाडेकर या दोघांचीच नावे जाहीर केली. आतापर्यंत शिवसेना एकसंध असल्याचे मानले जात होते. विधानसभा व महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीपासून याला सुरुंग लागत आहे. 

शहर बससेवेवरून काही दिवसांपूर्वी शहर संघटक बाळासाहेब कोकणे यांनी संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्यानंतर सोमवारी नगरसेविका पूनम मोगरे यांचे पती दिंगबर मोगरे यांनीही विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेत विशिष्ट लोकांनाच वारंवार पदे दिली जात असल्याचा आरोप मोगरे यांनी केला. बोरस्ते यांनी मोगरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

ऐनवेळी मटालेंचा पत्ता कट

स्थायी सदस्यत्त्वासाठी सिडकोतून नगरसेविका सुवर्णा मटाले यांचे नाव आघाडीवर होते. सभागृहात नावांची घोषणा होण्याअगोदर मटाले यांचे नाव होते; परंतु महापौरांच्या घोषणा चिठ्ठीतून अचानक त्यांचे नाव गायब झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. महत्त्वाची पदे ठराविक लोकांभोवतीच फिरत आहेत. त्याशिवाय साधे निवेदन द्यायचे झाले तरी विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नसल्याचे उघड बोलले जाते.

नगरसेवक संख्येनुसार शिवसेनेच्या तीन सदस्यांची नियुक्ती आवश्यक होती. मात्र महापौरांनी अयोग्य घोषणा केली.त्याविरोधात नगरसिवाकस मंत्री व प्रसंगी न्यायालयातही जाऊ - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेचा ( शिवसेना)  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT