manda mhatre-ganesh Naik
manda mhatre-ganesh Naik 
नवी मुंबई

भाजप नेत्यांची हांजी हांजी करण्यातच जातोय प्रशासनाच वेळ!

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : शहरातील वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी एकीकडे प्रशासनाचे अधिकारी जीवाची बाजी लावत असताना शहरात राजकीय कुरघोडींना ऊत आला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या नेतेमंडळींकडून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या भेटी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, बांगरही या भेटीगाठींना प्रतिसाद देत असल्यामुळे कोरोनासंदर्भात नियोजन करण्याच्या वेळा लोकप्रतिनिधींच्या हांजी हांजी करण्यात वाया जात आहे.

मार्च महिन्यापासून शहरात शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनामुळे नेतेमंडळींना बाहेर पडण्याची उपरती झाली नव्हती. सुरुवातीला भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तत्कालिन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि मिसाळ यांच्या भेटी सुरू झाल्या. त्यानंतर आता नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत नाईकांच्या भेटीगाठींचे सत्र सुरूच आहे. नागरिकांना जोपर्यंत कोरोनातून मुक्तता मिळत नाही, तोपर्यंत दर आठवड्याला भेटतच राहणार, असा संकल्प नाईक यांनी केला आहे.

या नेत्यांच्या भेटीगाठीच्या दोन तासांच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण प्रशासन वेठीस धरले जात आहे. भेटीगाठीच्या कार्यक्रमाआधी प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी बांगर यांची सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी एक तास वाया जातो. भेट होऊन गेल्यावर अधिकाऱ्यांना पुन्हा नव्या सूचना देण्यात वेळ जातो. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून आलेल्या वेगवेगळ्या सूचना पाळताना प्रशासनाने तयार केलेल्या नियोजनावर पूर्णपणे पाणी फिरवले जात आहे.

गेल्या पाच महिन्यांत शहरात कोरोनाने उच्चांक गाठला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच आता हळूहळू मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचवण्यापेक्षा आगामी निवडणुकांतील आपली सत्ता नेत्यांना महत्त्वाची वाटू लागली आहे. मंगळवारी नाईक यांनी बांगर यांना भेटून आलेल्या मुलाखतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण नागरिकांच्या प्रश्नांसाठी भेटतच राहणार, असा पुनरुच्चार केला. सध्या प्रशासनाला जाब विचारण्यास नगरसेवक जाऊ शकत नाही; पण एक आमदार म्हणून मी भेटतच राहीन, अशी भूमिका नाईक यांनी मांडली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये नाराजी
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांची सत्ता आहे. परंतु, या तीन पक्षांतील नेतेमंडळींपेक्षा पालिका आयुक्त बांगर हे भाजपचे आमदार, नेतेमंडळी आणि माजी नगरसेवकांना जास्त वेळ देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईकांना आयुक्त अधिक वेळ देत असल्यामुळे या नेतेमंडळींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत बांगर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दूरध्वनी केला असता, प्रतिसाद न मिळण्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT