collage (22).jpg
collage (22).jpg 
नवी मुंबई

कृषी विधेयकावरील टीकेला उत्तर.. भाजप आमदारांनी भरविला कृषी बाजार 

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी विधेयकावर होणाऱ्या टीकेला उत्तर देऊन ती फोल ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काल  महात्मा गांधीं जयंतीनिमित्त शहरात 151 ठिकाणी कृषी बाजार सुरु केले. येथे शेतकरी आपला शेतमाल थेट आणून रास्त दरात विकत आहेत.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शहरात विविध ठिकाणी अशा बाजारांचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर किसान ही घोषणा दिली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी कृषी विधेयक देखील मंजूर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांनाही किती फायदा होईल, हे आम्ही या कृषी बाजारांद्वारे दाखवून देऊ, असे लोढा यांनी यानिमित्ताने सांगितले. 

आरोग्यविषयक व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या बाजारांमध्ये व्यवहार होतील. या शेतकऱ्यांना हे बाजार चालविण्यासाठी भाजप कार्यकर्ते मदत करणार आहेत. हे बाजार शेतकऱ्यांच्या व लोकांच्या प्रतिसादानुसार रोज किंवा दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला, महिन्याला चालवले जातील. हा उपक्रम महापालिकेच्या सर्व वॉर्डांमध्ये कायमस्वरुपी पद्धतीने करण्याचाही प्रयत्न असल्याचे लोढा म्हणाले. 

मोकळ्या जागांवर किंवा इमारतींच्या आवारात हे बाजार होतील व त्यासाठी पोलिसांची किंवा महापालिकेची परवानगीही घेतली जाईल. त्यासाठीही भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना, माहिमच्या नगरसेविका शीतल गंभीर, भाजपनेते भालचंद्र शिरसाठ मदत करतील. विधानपरिषदेतील भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यापूर्वीच सुरु केलेल्या आठवडी बाजारांच्या संकल्पनेचा विस्तार करून हे कृषी बाजार सुरु करण्यात आले आहेत. 

उत्तर मुंबईतही खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते बोरीवली येथे कृषी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.  महिला बचत गटांच्या सहकार्याने हे बाजार चालविले जातील. उत्तर मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघातही आमदार व नगरसेवक यांच्या साह्याने असे आठवडी बाजार लावण्यात आले. बोरीवली येथे अडीच टन भाजी विकण्यात आली, असे  भाजपच्या पदाधिकारी नीला सोनी यांनी सांगितले. या बाजारांची संख्या आता वाढत जाईल व त्याचा फायदा शेतकरी व नागरिका अशा दोघांनाही होईल. कृषी विधेयकावर होणारी टीका किती अनाठायी आहे, हे याद्वारे दिसून येईल, असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT