Naik-Thakre-Desai
Naik-Thakre-Desai 
नवी मुंबई

गणेश नाईकांनी 'मंदिर वही बचायेंगे म्हणत' केली शिवसेनेची कोंडी !

सुजित गायकवाड

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी एका मंदिरावरून शिवसेनेची कोंडी केली असून या मुद्द्यावर शिवसेनेविरुद्ध वातावरण तापविण्यास सुरवात केली आहे . 

माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल यांचे महापे येथील बावखळेश्‍वर मंदिर सर्वोच्च न्यायालयाने बेकादा ठरवल्यानंतर त्याच्या बचावासाठी नवी मुंबईतील मंदिर बचाव समिती पुढे आली आहे.

विशेष म्हणजे मंदिरावर ओढवलेल्या संकटाला शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई जबाबदार असल्याचा आरोप समितीने केला आहे. तसेच अयोध्येत 'मंदिर वहीं बनायेंगे' असा आग्रह असलेल्या शिवसेनेची मते कुरघोडीच्या राजकारणात विभागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापेतील डोंगररांगांच्या कुशीत महादेव, दुर्गा आणि गणपती या देवांची भव्य संगमरवरी मंदिरे बावखळेश्‍वर ट्रस्टतर्फे उभारण्यात आली आहेत. एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक 12 वरील एक हजार 119.82 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर मंदिरासह तलाव तयार करण्यात आला आहे. 

परंतु नवी मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी माहिती अधिकारात कागदपत्रे गोळा करून हे मंदिर बेकायदा असल्याची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ही वास्तू बेकायदा असल्याचे स्पष्ट करून जमीनदोस्त करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. 

त्यादरम्यान बावखळेश्‍वर ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने स्थगिती देत बाजू मांडण्याची संधी ट्रस्टला दिली. त्या वेळी मंदिर अधिकृत असल्याचा दावा करीत सुधारित नियमाप्रमाणे दंड भरून जागेवरील बांधकाम नियमित करण्यास ट्रस्टने तयारी दर्शवली.

त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदिल दर्शवून एमआयडीसीला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु त्या वेळेस उद्योगमंत्री म्हणून एमआयडीसीचे अधिकार असलेल्या देसाईंनी नाईकांवरील राजकीय सूड उगवण्यासाठी अहवालात बांधकाम अधिकृत करता येत नसल्याचे नमूद केले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंदिराच्या विरोधात गेल्याचा आरोप मंदिर बचाव समितीने केला आहे.

शिवसेना अयोध्येत मंदिर वाचवण्याच्या वल्गना करत असली, तरी राज्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे वाचवण्यात हा पक्ष राजकारण करीत असल्याचे वातावरण सद्यस्थितीत नवी मुंबईत मंदिर बचाव समितीमार्फत सुरू आहे. याच मुद्द्यावरून शनिवारी मंदिर बचाव समितीतर्फे वाशीतील शिवाजी महाराज चौकात सुभाष देसाई यांच्याविरोधात जोरदार निर्दशने करण्यात आली. 

या वेळी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे काही नेते सहभागी झाले होते. देसाईंविरोधात काळे झेंडे दाखवून हे आंदोलन करण्यात आले.दरम्यान, आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाशी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी तक्रार दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT