GaneshNaik
GaneshNaik 
नवी मुंबई

विरोधकांचा वेळीच समाचार घेईन  : आमदार गणेश नाईक 

सकाळन्यूजनेटवर्क

वाशी : "नवी मुंबईवर माझी पकड ही कायमची आहे. मात्र किरकोळ आणि अवसानघातकी लोक मला आव्हान देत आहेत. काही जण पोकळ डरकाळ्या फोडून वातावरण दूषित करीत असले, तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. विरोधकांचा मी वेळीच समाचार घेईन', असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. येत्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल,'' असे आमदार नाईक यांनी ऐरोली येथील कार्यक्रमात मत व्यक्त केले. 

भाजपच्या ऐरोली प्रभाग क्रमांक -15 च्या वतीने विविध नागरी कामांचा शुभारंभ, कार्य-अहवालाचे प्रकाशन, महिलादिनाच्या निमित्ताने हळदी-कुंकू आणि पैठणीचा खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम; तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन राधिकाबाई मेघे विद्यालयात करण्यात आले होते. त्या वेळी आमदार नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधला. 

या वेळी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सेक्‍टर 14 व 15 मधील रस्त्यांचे डांबरीकरण व पट्टे मारणे, पोलिस चौकी ते पूर्णा सोसायटीलगतचा नाला बंदिस्त करणे, स्वामी विवेकानंद उद्यानाचे सुशोभीकरण, "लेक व्ह्यू' सोसायटीजवळील ओपन जिमचे लोकार्पण, गटारे व पदपथाच्या नूतनीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात विजेत्या महिलांना विशेष पैठणी व लकी विजेत्यांना साड्या देण्यात आल्या. 

या कार्यक्रमाला माजी आमदार संदीप नाईक, नगरसेवक अनंत सुतार, शशिकला सुतार, ऍड. संध्या सावंत, अभिनेत्री अस्मिता सुर्वे, "रंग माझा वेगळा'फेम अभिनेत्री रेश्‍मा शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता पाटील, माजी नगरसेवक अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT