-raju-bhoir-dimple-mehata 
नवी मुंबई

मिरा-भाईंदर: भाजप-शिवसेनेत उपऱ्यांची चलती?  निष्ठावंत मात्र पदांच्या प्रतीक्षेतच 

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा

भाईंदर   : मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक झाल्यावर भाजपने सत्तेवर ताबा मिळवला. तथापि, सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष शिवसेना यांनी निष्ठावंतांना डावलून सर्व सूत्रे "उपऱ्यां'च्या हातात दिल्याचे चित्र दिसते आहे.

त्यामुळे दोन्ही पक्षांतील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. 

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांपेक्षा बाहेरून आलेल्यांना महत्त्व प्राप्त झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ध्रुवकिशोर पाटील यांची स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी निवड होणार आहे.

मिरा-भाईंदरमध्ये भाजप जिवंत ठेवणाऱ्यांना मात्र दूर केले जात आहे, असा आरोप होत आहे. भाजपमधील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे रोहिदास पाटील यांचे सभागृह नेतेपद काढले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 


शिवसेनेमधील स्थिती वेगळी नाही. बविआमधून आलेले राजू भोईर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचे पत्र शिवसेनेने महापौरांना दिले आहे. त्यामुळे या पक्षातील निष्ठावंत नाराज असल्याचे बोलले जात आहे.

सत्तेच्या राजकारणात 10 वर्षे असलेल्या भोईर यांनी महापालिका सभागृहात एकदाही कोणत्याही प्रश्‍नाबाबत तोंड उघडले नव्हते. त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे. 

या पार्श्‍वभूमीवर मिरा-भाईंदरमध्ये सत्तेच्या सारीपाटावर उपऱ्यांची चलती सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे उपऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याची भावना निष्ठावंत पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भाजप आणि शिवसेना यांनी निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बविआ आदी पक्षांमधून येणाऱ्यांना तिकिटे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला होता.

निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून भाजप सत्तेवर आला. त्यानंतर उपमहापौरपदी अन्य पक्षातून आलेल्या चंद्रकांत वैती यांची वर्णी लागली. महापौर झालेल्या डिम्पल मेहता काही वर्षांपूर्वीच भाजपमध्ये आल्या आहेत. आमदार नरेंद्र मेहता हे त्यांचे दीर आहेत.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT