Ganesh Naik_Manda Mhatre
Ganesh Naik_Manda Mhatre Sarkarnama
नवी मुंबई

बेलापुरात येऊन डिवचणाऱ्या गणेश नाईकांना मंदा म्हात्रेंचे ऐरोलीत जाऊन सडेतोड प्रत्युत्तर

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट आमदार गणेश नाईक यांचा मतदार संघ असणाऱ्या ऐरोलीतील नागरी समस्यांना हात घालत शिरकाव केला आहे. ऐरोली मतदार संघातील घणसोली, दिवा आणि ऐरोली येथील मच्छिमार जेटींचा विकास करून जलवाहतूक सुरु करण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी मेरीटाईम बोर्डाकडे केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाईकांनी बेलापूर मतदार संघात येऊन विविध विकास कामांचे भूमिपूजन करून म्हात्रे यांना डिवचण्याचे काम केले होते. याला प्रतिउत्तर म्हणून म्हात्रे यांनी थेट ऐरोली मतदारसंघातील प्रश्नांना हात घातले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (MLA Manda Mhatre went to Airoli and gave an answer to Ganesh Naik)

नवी मुंबईतील दादा-ताईंचे विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रूत आहे. राष्ट्रवादीनंतर भाजपमध्ये आल्यावर या वादावर पडदा पडेल, असे सर्वांना वाटत होते. परंतू विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून एकमेकांच्या वाटेत आणलेले अडथळे पाहिल्यानंतर हा वाद आता शीतयुद्धामार्गे अतिटोकाला जाताना दिसत आहे.

नवी मुंबई शहरात सद्या महापालिकेच्या आगामी निवडणुकाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत नाईकांची महापालिकेवरील निसटत चाललेली एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुठ आवळली आहे. त्याला शह देण्यासाठी नाईकांकडून वेगवेगळे हातखंडे आजमावले जात आहेत. पण हे करताना आपल्याच पक्षातील ज्येष्ठ सहकारी आमदारांना डावलले जात असल्याचे वारंवार वेगवेगळ्या घटनांमधून समोर आले आहे.

याबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडूनही फारशी दखल घेतली जात नसल्याने थेट बेलापूर मतदारसंघात नागरी विकास कामांच्या उद्घाटनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये आमदार म्हात्रे यांना बाजूला सारण्याचे काम सुरु होते. एका खासगी कार्यक्रमात बोलताना आपल्याला एक महिला म्हणून स्वकीयांकडूनच डावलेले जात असल्याची खंत म्हात्रे यांनी अलिकडेच बोलून दाखवली होती. अशा परिस्थितीत थेट ऐरोली मतदार संघातील विकास कामांचा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केल्याने त्यांनी शहाला काटशहा देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बेलापूर विधानसभा मतदार संघातील दिवाळे, करावे आणि वाशी गाव येथील जेटीच्या कामांसोबत ऐरोली मतदार संघातील जेटींच्या कामांबाबत केलेल्या मागणीची माहिती घेण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या दरम्यान म्हात्रे यांनी ऐरोली मतदार संघातील समस्या आणि विकास प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले. पण, आपल्याला राजकारण करायचे नाही. कोणाला प्रतिआव्हान द्यायचे नाही. कोळी बांधवांकरिता जेटी तयार करण्याचा प्रकल्प गेले अनेक वर्षे राबवत आहे. तसा नवी मुंबईतील प्रवाशांकरिता हे प्रकल्प उभारण्याची मागणी केली असल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT