Raju Patil, Raj Thackeray
Raju Patil, Raj Thackeray  Sarkarnama
नवी मुंबई

शिवसेनेच्या दणक्यानंतर मनसे आमदार राजू पाटील संतापले अन् दिला इशारा

सरकारनामा ब्युरो

कल्याण : भोंग्यांवरून शिवसेना (Shivsena) आणि मनसेतील (MNS) वाद शिगेला पोहचलेला असताना फोडोफोही जोरात सुरू झाली आहे. पहिला धक्का शिवसेनेने देत कल्याण डोंबिवलीतील दोन माजी नगरसेवकांसह दहा पदाधिकाऱ्यांना गळाला लावले आहे. त्यावरून या मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजु पाटील संतापले आहेत. दुसऱ्या पक्षातील लोकांना धमकावून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Shivsena-MNS latest news update)

कल्याण -डोंबिवलीतील घारीवली, काटई, उसरघर येथील मनसेचे माजी नगरसेवक तसेच मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने आणि मनसेच्या माजी नगरसेविका पूजा पाटील, मनसे तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील यांच्यासोबत सुभाष तुकाराम पाटील, पांडे अण्णा, निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे, विठ्ठल शिंदे आदींनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि विद्यार्थी सेनेचे शाखा अध्यक्ष संदीप मोरे यांनीही मनसेला रामराम ठोकला आहे. राजु पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. (MNS Raju Patil Latest Marathi News)

यावर बोलताना पाटील म्हणाले, कालच ते पदाधिकरी मला भेटले होते. खोट्या केसेच्या धमक्या देत आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितलं. लुटमारी करण्याची त्यांची जुनी सवय आहे. पक्षप्रमुखच कोत्या मनाचे आहेत, मग त्यांच्या पिल्लाकडून काय अपेक्षा करणार, असा संतापजनक सवाल पाटील यांनी केला. हे अपेक्षितच असल्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असं पाटील म्हणाले.

प्रत्येक मनसैनिक हा इथला नगरसेवक, आमदार असल्यामुळे कोण पक्षातून गेल्याने आम्हाला फरक पडणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. घाणेरडे राजकारण करून आपला पक्ष वाढविण्याची वेळ त्यांच्यावर यावी सारखी दुर्दैवी बाब नाही. विचाराची लढाई विचारांनी लढवली जावी, मात्र दुर्दैवाने त्यांना हे सध्या समजवण्यासाठी त्यांच्याबरोबर कोणी नाही. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते नगरसेवक पळविण्याचे आम्हाला राज ठाकरे यानी शिकविलेले नाही. मला कोणी ठरवून त्रास देऊ शकत नाही. कोणी मला वैयक्तीक घेऊ नये, असा इशारा पाटील दिला.

दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला हे यश मिळाल्याचं बोललं जात आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद महापालिकांवर राजकीय नेतेमंडळींच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT