devendra Fadnvis, hitendra thakur, devendra fadvanis  Sarkarnaam
नवी मुंबई

Loksabha Election : पालघर लोकसभेसाठी बविआची भूमिका महत्वाची ठरणार ; भाजप, शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच

सरकारनामा ब्युरो

संदीप पंडित

Palghar News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून केली जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी अनेक पक्षांनी केली आहे. महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून गोंधळ उडाला आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्ते अजून ओपन झालेले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा असून तीन जागा या बविआकडे आहेत. एक जागा कम्युनिस्ट पक्ष, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. बविआच्या तीन जागा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या कम्युनिष्ट पक्षाची एक जागा पकडल्यास जिल्ह्यात त्यांचे चार मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे. दुसऱ्या बाजूला पालघर आणि विक्रमगड मतदार संघातही बविआची ताकद असल्याने लोकसभेला बविआ कोणती भूमिका घेते याकडे लक्ष असणार आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा झाला. त्याच प्रमाणे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे विभाजन होऊन नव्याने पालघर मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत बविआने आपली ताकद दाखवून पहिला खासदार निवडून आणला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपने बविआचा प्रभाव कमी केला होता.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपने हा गड राखला होता. गेल्या वेळी मात्र शिवसेनेने या जागेवर दावा दाखवून भाजपच्या उमेदवाराला आयात करून ही जागा जिंकली होती. आता शिवसेना फुटल्यानंतर आताचे खासदार राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आहेत.

एकनाथ शिंदे गटाने या जागेवर दावा केला असून पुन्हा राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने भाजप आणि सेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार असलेल्या कल्याणच्या जागेवर दावा केल्याने पालघरच्या जागेवर सेनेने दावा केल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सेनेने परस्पर राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी भाजपने मात्र पालघरवर दावा केला आहे . त्यासाठी त्यांनी जिल्हयात वॉर रूमही तयार केली असल्याने पालघरची जागा शिंदे गटाला न सोडण्याचा पवित्रा घेतल्याने युतीमध्ये वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बविआच्या भूमिकेकडे लक्ष्य

पालघर लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदार हे वसई, नालासोपारा, बोईसर या ठिकाणी आहेत तर डहाणू मतदारसंघातील मतदाराची साथ ही मिळाल्यास बविआ हा हुकमाचा पत्ता ठरणार आहे. यावेळी पुलाखालून बरेच पाणी गेल्याने बविआ पुन्हा आपला उमेदवार उभा करते की इतर पक्षाला पाठिंबा देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT