नवी मुंबई

मुख्यमंत्र्यांनी रात्री बारा वाजता दिला रवीशेठ पाटलांना भाजपमध्ये प्रवेश!

विकास मिरगणे

नवी मुंबई :  माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजप प्रवेश केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. यावेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

मुख्यमंत्री काल दिवसभर राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांचे उपोषण सोडण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना बराच वेळ लागला. आधीच्या नियोजनानुसार सायंकाळी सहाच्या सुमारास पाटील यांचा प्रवेश होणार होता. मात्र मुख्यमंत्र्यांना यायला रात्रीचे बारा वाजले. त्यानंतर पाटील यांचे मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये स्वागत केले.

रवीशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघांतून दोन वेळा निवडून आले असून माजी मुख्यमंत्री बँ.ए.आर अंतुले यांचे खंदे समर्थक होते. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. परंतु काही महिन्यांपासून ते काँग्रेसमध्ये नाराज होते. अनेक वर्षांपासून शेकाप हा त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत शेकापला सोबत घेऊन महाआघाडी करणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी ही बाब वेळोवेळी बोलूनही दाखवली होती. 

विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप या महाआघाडीमार्फत पेणमधून विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने रवीशेट पाटील यांची उमेदवारी कापली जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रवीशेठ पाटील गेल्या काही दिवसापासून काँग्रेसपासून दूरच होते. अखेर अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या रवीशेट पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रवीशेठ किंवा त्यांचा मुलगा वैकुंठ पाटील यांना पेणमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT