नवी मुंबई

राष्ट्रवादीला बसणारा आणखी एक झटका टळला; या आमदारांचे म्हणणे मी पवार साहेबांसोबत!

विकास मिरगणे

कर्जत : कर्जतचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. त्यांच्याविषयी निर्माण झालेला संभ्रम आज अखेर स्वतः सुरेश लाड यांनीच दूर केला. मी भाजपमध्ये जाणार नसून माझी निष्ठा ही पवार साहेबांवरच असल्याचे लाड यांनी या वेळी स्पष्ट केले. 

गेले अनके दिवस कर्जत मतदारसंघात आमदार सुरेश लाड यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु होत्या. शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांचा त्यांच्यासमोर पर्याय असल्याच्या चर्चेला  उधाण आले होते. त्यात  सुनील तटकरे  हे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी गेल्याचे जे छायाचित्र सोशल मीडियात फिरत होते. त्यामध्ये सुरेश लाड देखील दिसत होते. त्यामुळे हा संभ्रम अधिक वाढला. यावर आपल्या पक्षांतराच्या बातम्या हे विरोधक पसरवित असल्याचा आरोप लाड यांनी केला.

सुरेश लाड यांनी काल कार्यकर्त्यांची बैठक बोलावून हा संभ्रम दूर केला.  या बैठकीसाठी राष्ट्रवादी भवन मध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. कर्जत तालुक्यात देखील तेच ते चेहरे वर्षोनुवर्षे  राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर असल्याची तरुण कार्यकर्त्यांची तक्रार आहे. मात्र आज अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनी तरुणांसाठी आपली जागा मोकळी करून देण्याची तयारी  दाखविली. 

यावेळी  राष्ट्रवादी कांग्रेसचे उपाध्यक्ष भगवान चँचे, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, राजेश लाड , तानाजी चव्हाण तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, नगरसेवक उमेश गायकवाड, एकनाथ धुळे  यांची भाषणे झाली.  लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि अनेक नेत्यांच्या पक्षांतरामुळे  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य दूर करण्याचं प्रयत्न या बैठकीत झाला. तुम्ही पक्षांतर करणार या वृतांत तथ्य आहे का ? तशी आपल्याला ऑफर आहे का? अशा  पत्रकारांच्या  अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली .

कर्जत तालुक्यात आगामी काळात पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत  त्यानंतर विधानसभेला सामोरे जायचे आहे  . या निवडणुकांमध्ये उमेदवार कोण असेल यापेक्षा पक्षाला विजयी  करण्यासाठी ताकद पणाला लावावी असे आवाहन सुरेश लाड यांनी कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादीचे आभाळ फटू लागले असताना पक्ष सावरण्याचा प्रयत्न सर्वस्तरावर होत असून याला  कितपत यश येते हे आगामी काळात स्पष्ट होईल 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT