Nahata Naik.
Nahata Naik. 
नवी मुंबई

विजय नाहटांची तलवार म्यान, गणेश नाईक यांचा भाजपतर्फे अर्ज दाखल  

सरकारनामा

वाशी: ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी शुक्रवारी (ता.4) उमेदवारी अर्ज दाखल केला. 

गणेश नाईक यांच्या विरोधात मनसेच्या वतीने नीलेश बाणखेले, वंचित आघाडीच्या वतीने प्रकाश ढोकणे यांनी अर्ज दाखल केला.

या वेळी गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली सेक्‍टर 6 येथील माजी आमदार संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते ऐरोली विभाग कार्यालयापर्यंत प्रचार रथावर स्वार होऊन ढोल-ताशांच्या निनादात शक्तिप्रर्दशन करत मिरवणूक काढण्यात आली. सुमारे दीड तास ही मिरवणूक सुरू होती.


 या रॅलीमध्ये माजी आमदार संदीप नाईक, आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी नेते उपस्थित होते. मात्र, महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या रॅलीत काही शिवसैनिकांनी गैरहजर राहत सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसून आले.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती; तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमेदवारी न देता मंदा म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने गणेश नाईकांचा पत्ता कट झाला होता. 

मात्र, पुत्र संदीप नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी आग्रह धरत गणेश नाईक यांना रिंगणात उतरण्याची गळ घातली. त्यामुळे गणेश नाईक यांनी शक्तिप्रर्दशन करत शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐरोली व बेलापूर या दोन्ही जागा भाजपला गेल्यामुळे शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली होती.

 त्यामुळे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईकांच्या विरोधात शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहावे, असे शिवसैनिकांचे म्हणणे होते. मात्र, विजय नाहटा यांनी उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केले . 

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक शिवराम पाटील हे उमेदवारी अर्ज भरताना गणेश नाईक यांच्यासोबत उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी पक्षाचा आदेश असताना युती धर्म पाळत गणेश नाईकांच्या रॅलीत उपस्थित राहावे, असे आवाहन केले असतानादेखील त्याकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

बंड होणार नाही :नाईक

संदीप नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली होती; तर ती त्यांनीच लढवावी अशी इच्छा होती. मात्र, संदीप नाईक यांनी मला निवडणुकीत उभे राहावे, अशी इच्छा व्यक्त केली. संदीप नाईक यांच्या इच्छेखातर निवडणुकीत उभा राहिलो आहे.

संदीप नाईकांना तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्ट्रिक मारण्याची संधी होती. मात्र, त्यांनी मला उमेदवारी दिली. बापाचा वारस हा मुलगा होता; पण राज्यातील राजकारणामध्ये पहिलीच घटना असेल, त्यांनी मुलाच्या ठिकाणी बाप वारस होतो; तर युतीमध्ये कोणतेच रुसवे फुगवे नसून, बंड होणार नाही.


- गणेश नाईक, उमेदवार, भाजप-शिवसेना महायुती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT