<div class="paragraphs"><p>sarkarnama</p></div>

sarkarnama

पिंपरी चिंचवड

मोठी बातमी : लष्करातील निवृत्त दोन जवानच चालविते होते लष्कर भरतीचे रॅकेट, अनेकांना गंडा

सरकारनामा ब्युरो

पिंपरीःमिलीटरी तथा लष्कर भरतीचं मोठं रॅकेट औंध, पुणे येथील मिलीटरी (Military) कॅम्पमधील मिलीटरी इंटेजिलन्सचे विभागामुळे उघडकीस आले आहे. लष्करातून निवृत्त झालेले दोन जवान आणि त्यांचा साथीदार एजंट असे त्रिकूट हे रॅकेट चालवत होते. लष्करात व्हेईकल मॅकनिक म्हणजे वाहन तंत्रज्ञ या पदासाठी त्यांनी अनेकांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतले होते. त्यातील काही तरुण हे औंध येथील मिलीटरी कॅम्प (Aundh Military Camp) येथे जमा झाल्याने हे प्रकरण समोर आले.

लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने (Army Intelligence Department) रक्षक चौक,औंध मिलीटरी कॅम्पसमोर या त्रिकूटाकडून फसल्या गेलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन स्थानिक सांगवी पोलसांच्या ताब्यात दिल्यानंतर ही फसवणूक आणि बनावटगिरी उघडकीस आली. त्यांनी अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे. या टोळीकडून दोन लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, बनावट कागदपत्रे, शिक्के, ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिली.

आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश गुरुवारी (ता.६) न्यायालयाने दिला. सतीश कुंडलिक डहाणे (वय ४०,रा. औंध मिलीटरी कॅम्प), श्रीराम बालाजी कदम (रा. धानारो ,पुणे) आणि अक्षय देवलाल वानखेडे (रा. तेल्हारा,जि. अखोला) अशी त्यांची नावे आहेत.

डहाणे हा लान्सलाईक, तर वानखेडे हा मेसन म्हणून लष्करातून निवृत्त झालेला आहे. तर, कदम हा भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालवित होता. याबाबत गजानन मिसाळ (वय २३, रा. अमरावती) या तरुणाने फिर्याद दिली आहे. आरोपींनी त्याच्याकडू पहिला हफ्ता म्हणून सत्तर हजार रुपये घेतलेही होते. त्यांचे मित्र धनंजय वट्टमवार (वय २१), निलेश निकम (वय २३, रा. मालेगाव), अक्षय साळूंके (वय २५, रा. चाळीसगाव) यांचीही फसवणूक झालेली आहे.

आरोपी हे आयटीआयमधून मेकॅनिकचा कोर्स पास झालेल्यांची यादी मिळवून त्यातील एकेकाला गाठत होते. लष्करात वाहन मेकॅनिक पदावर पाच लाख रुपयांत नोकरीला लावतो, असे सांगून ते गरजू तरुणांची फसवणूक करीत होते. पीएसआय एम.डी. वरुडे या बनावटगिरी व फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT