पिंपरी चिंचवड

पिंपरीत भाऊंच्या पदाधिकाऱ्याकडून विषय मंजूर; मात्र दादांच्या पदाधिकाऱ्यांचे स्थगितीचे पत्र

उत्तम कुटे

पिंपरी : स्थायी समितीने मंजूर केलेला विषय स्थगित करण्याची मागणी महापौरांनी केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील विसंवाद समोर आला आहे. शहरातील भाजपच्या दोन आमदार समर्थक पदाधिकाऱ्यांतील हे शह, काटशहाचे राजकारण चर्चचा विषय ठरले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांचा संयुक्त परिवहन उपक्रम असलेल्या पीएमपीला संचलन तुटीपोटी 16 कोटी रुपये देण्याचा विषय नुकताच (ता.12) ममता गायकवाड अध्यक्ष असलेल्या पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला होता. मात्र, तो स्थगित ठेवण्याची मागणी लगेच काल (ता.13) महापौर राहूल जाधव यांनी केली. तसे पत्रच त्यांनी गायकवाड यांना दिले आहे. आक्रमक महापौरांची मागणी नेमस्त व शांत स्थायीच्या अध्यक्षांकडून डावलली जाणे संभव नाही. परिणामी हा विषय स्थगित होण्याची दाट शक्यता आहे.

गायकवाड या शहराचे कारभारी असलेले भाजपचे चिंचवडचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक असलेल्या विनायक राऊत यांच्या पत्नी आहेत. तर, जाधव हे शहराचे उपकारभारी आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर पाठीराखे आहेत. 2017 ला पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या या दोन गटात पदाधिकारी नियुक्तीवरून रस्सीखेच झाली होती. ती दुसऱ्या वर्षीही पाहायला मिळाली. नंतर त्यांच्यात श्रेयबाजीही झाली होती.

पीएमपीकडून पिंपरी-चिंचवडला सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचे कारण निधी अडविण्यामागे महापौरांनी दिले आहे. पीएमपीवर वर्चस्व असलेल्या पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपला पिंपरी भाजपचा हा घरचा आहेर समजला जात आहे. असाच काहीसा पवित्रा मागील स्थायीच्या आक्रमक अध्यक्षा सीमा सावळे यांनीही घेतला होता. त्यावेळी भोसरीतील महेशदादा समर्थक महापौर नितीन काळजे हे शांत व नेमस्त स्वभावाचे होते. तर, तुकाराम मुंडे पीएमपी अध्यक्ष होते. ते पिंपरीत येत नाही,तोपर्यंत आपला हिस्सा न देण्याची घोषणा सावळे यांनी केली होती. त्या व मुंडे यांच्यात त्यावेळी, भर बैठकीत तू,तू मैं मैं झाली होती. यावेळी, उलटे घडले आहे. नेमस्त स्थायी अध्यक्ष तथा स्थायी समितीने आपला हिस्सा देऊ केला आहे. मात्र, आक्रमक महापौरांनी तो अडवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT