Ajit Gavhane Sarkarnama
पिंपरी चिंचवड

बेरोजगारीची दाहकता : पिंपरी पालिकेच्या ३८६ जागांसाठी तब्बल एक लाख तीस हजार अर्ज

Ajit Gavhane : 'वेदांत-फॉक्सकॉन' गुजरातला देणाऱ्या राज्य सरकारला निवडणुकीत बेरोजगारच अद्दल घडवतील, अजित गव्हाणेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३८६ जागांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार 470 इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. यातून पिंपरी-चिंचवड शहरातीलच नाही, तर राज्यातील बेरोजगारीची दाहकता समोर आली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसह राज्य सरकारवर आज हल्लाबोल केला. ही बेरोजगारी काही अंशी कमी करू शकणारा 'वेदांत-फॉक्सकॉन' प्रकल्प गुजरातच्या पायाशी वाहणाऱ्या कर्मदरिद्री राज्य सरकारला बेरोजगार निवडणुकीत अद्दल घडवतील. त्याची सुरुवात पिंपरी-चिंचवडरपासून होईल,असा दावा राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.

पिंपरी पालिकेने विविध 386 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले असून त्यासाठी तब्बल 1 लाख 30 हजार 470 अर्ज आले आहेत. बेरोजगारीच्या या दाहक वास्तवावर बोट ठेवत गव्हाणे यांनी भाजपचा समाचार घेतला. राज्यात बेरोजगारीची दाहकता किती आहे त्याचे हे एक अत्यंत बोलके उदाहरण आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता, तर यापैकी किमान 50 टक्के बेरोजगारांना नक्कीच नोकरीची संधी मिळाली असती, असे ते म्हणाले.

बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दूरदृष्टीने आणि धडाकेबाज निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड जगाच्या नकाशावर आले. टाटा, बजाज यासारख्या मोठ्या प्रकल्पांना त्यांनी शहरात आणून इथेच रोजगारनिर्मिती करून दिली. तळेगाव, चाकण, रांजणगावातील औद्योगिकरण वाढवले. हिंजवडी, तळवडे, खराडीसारख्या आयटी पार्क्सने राज्यातीलच नव्हे तर देशभरातील युवकांच्या हाताला काम दिले, असे त्यांनी सांगितले.

आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा पर्यायाने आपल्या राज्याचा इतका सखोल व संवेदनक्षम विचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पाठीशी इथला प्रत्येक युवक ठामपणे उभा राहणार असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीनेच शहरातील बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून दिल्याचे येथील प्रत्येक सुजाण नागरिक मान्य करेल. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या भ्रष्ट कारभाराला विटलेल्या नागरिकांबरोबरच इथला संतप्त बेरोजगार युवावर्गही भाजप राज्यकर्त्यांना त्यांची खरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी पालिका निवडणुकीत बेरोजगारांच्या उद्रेकाचा प्रत्यय नक्की होईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT