Mahesh Landge
Mahesh Landge 
पिंपरी चिंचवड

शिवसेनेचा लांडगेंच्या मतदारसंघावर दावा, तर भाजपच्या इच्छुकांचीही मोर्चेबांधणी

उत्तम कुटे

पिंपरी : भाजपचे सहयोगी सदस्य व विधानसभेला भाजपकडून तिकिट जवळपास नक्की झालेले भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघावर शिवसेनेने केवळ दावाच सांगितलेला नाही, तर तेथील पक्षाच्या सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखतीही दिल्या आहेत. त्यामुळे युती झाली, तरी भोसरी कुणी घ्यायची यावरून शिवसेना, भाजपमध्ये पेच निर्माण होणार आहे. दरम्यान, भाजपच्याही एका मातब्बराने भोसरीतील उमेदवारीसाठी दिल्ली व नागपूरपर्यंत सेटिंग लावल्याने  दोन्ही बाजूंनी लांडगे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

भाजप,शिवसेनेचा एकेक आमदार पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. तर, तिसरे अपक्ष महेश लांडगेआहेत. ते यावेळी भाजपकडून लढणार हे जवळपास नक्की झाले आहे. असे असतानाही जशा भाजपने शहरातील तिन्ही मतदारसंघातील आपल्या इच्छुकांच्या मुलाखती शहर कार्यालयात घेतल्या. तशाच त्या नंतर शिवसेनेनेही मंगळवारी मुंबईत घेतल्या. भोसरीविषयी अधिक चर्चा त्यावेळी झाली. कारण युतीत २००९ ला हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे मुलाखतीपूर्वीच तेथील इच्छुकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपले उपनेते शिवाजीराव आढळऱाव पाटील यांच्याकडे हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याची मागणी नुकतीच केली होती. 

त्यानुसार  भोसरी आपलाच असल्याने युती झाली, तरी तो सोडायचं कारण नाही,असे इच्छुकांनीही मुलाखत घेणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही ठणकावून सांगितले. भोसरीत लोकसभेला युतीच्या उमेदवाराला ३७ हजाराचे मताधिक्य मिळाल्याने तेथून शिवसेना नक्की विजयी होईल,अशी खात्री त्यांनी दिली. तसेच गतवेळी शिवसेना उमेदवाराला इथे दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली ही बाबही त्यांनी नजरेस आणून दिली. भोसरीतून आढळरावांचे समर्थक माजी नगरसेवक धनजंय आल्हाट, बाजीराव लांडे, कामगार नेते इरफान सय्यद, उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, रविंद्र खिलारे, शरद घुले यांनी मुलाखती दिल्या आहेत.

दरम्यान, भोसरीमुळे शिवसेनेची अवस्था इकडे आड, तिकडे विहिर अशी होणार आहे. कारण भोसरीसाठी आग्रही राहून ती पदरात पाडून घेतली, तर विद्यमान आमदार असलेली पिंपरीची जागा त्यांना सोडावी लागणार आहे. कारण त्या जागेसाठी आऱपीआय हा महायुतीतील तिसरा पक्ष आग्रही आहे. फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्यूल्यामुळे तीनपैकी दोन जागांवर शिवसेनेला दावा ठोकता येणार नाही. त्यात भाजपची पालिका व केंद्रातील बहूमता व एकूणच त्यांची चढती कमान आणि आक्रमकता पाहता शिवसेनेला जागावाटपात काहीशी नमती भूमिका पिंपरी-चिंचवडमध्येच नाही, तर राज्यातही घ्यावी लागेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT